Ratan Tata passes away: टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एनसीपीए मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात होते. दरम्यान, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले. अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरेंपासून ते कुमार मंगलम बिर्ला, रवी शास्त्री यांच्यासह राजकारण्यांपासून ते अभिनेते, खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत मैदानावर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी 3.30 वाजेनंतर रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
पोलिसांकडून मानवंदना
टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या अंत्ययात्रेला दुपारी सुरुवात होत त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानुसार वरळी स्मशानभूमीत रतन टाटा यांचे तिरंग्यात गुंढाळलेले पार्थिव दाखल होत त्यांना पोलिसांकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, स्मशानभूमी परिसरात नागरिकांनी त्यांच्या दर्शनासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
अमित शहा यांची उपस्थिती
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्री मंत्री पियुष गोयल, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते.