मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली असून त्यांना भारतातच नाहीतर परदेशातही आदर आणि प्रेम मिळत आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचे शिक्षण कोठून झाले ते जाणून घेऊया.
उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष यांचा रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबई येथे झाला. रतन टाटा यांनी प्राथमिक शिक्षण मुंबई येथे कॅम्पियन स्कूलमध्ये ८ वी पर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि नंतर बिशप कॉटन स्कूल, शिमला येथे शिक्षण घेतलं.
कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश
रतन टाटा यांनी भारतात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. त्यानं अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला. येथून त्यांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) पदवी प्राप्त केली. यानंतर, 1975 मध्ये, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम केला. या कार्यक्रमात त्यांना व्यवस्थापन आणि नेतृत्वाची सखोल माहिती मिळाली.
करिअरचा शुभारंभ
रतन टाटा यांनी 1960 च्या दशकात टाटा समूहातून आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. त्यांनी टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरमध्ये चुनखडी काढण्याचे आणि ब्लास्ट फर्नेस हाताळण्याचे काम केले. या कालावधीत त्यांनी टाटा समूहाच्या विविध क्षेत्रांचा अनुभव घेतला, जो नंतर त्यांच्या नेतृत्वासाठी उपयुक्त ठरला.
टाटा समूहासाठी नवीन स्थान
टाटा समूहात 1960 पासून ते सक्रिय झाले. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद 1991 मध्ये स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ उत्पन्नच वाढवले नाही तर जागतिक स्तरावरही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांनी कार्य कौशल्याने पोलाद, ऑटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि आदरातिथ्य अशा विविध क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले.
रतन टाटा यांच्या यशामध्ये काही महत्त्वाच्या उपलब्धी यांचा समावेश आहे, उदाहरणार्थ टाटा स्टीलने ब्रिटीश स्टील निर्माता कोरसची खरेदी आणि टाटा मोटर्सने जग्वार आणि लँड रोव्हरचे अधिग्रहण केले. त्यांच्या या निर्णयाने टाटा समूह जागतिक स्तरावर मजबूत प्रतिस्पर्धी बनला.
टाटा नावीन्यपूर्णतेसाठी ओळखले जातील
रतन टाटा यांच्या प्रेरणादायी शैक्षणिक आणि करिअरच्या यशाच्या कहाणीने भारतीय उद्योगाला नावीन्य आणि नेतृत्वाची प्रेरणा मिळाली. त्यांची दूरदृष्टी आणि प्रयत्नांनी त्यांना एक प्रख्यात उद्योगपती म्हणून प्रस्थापित केले आहे, जे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत राहतील.