Rath Saptami 2025 : हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यातील एक रथसप्तमी. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. यादिवशी सूर्यदेवाची यथोचित पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार सप्तमी तिथीला सूर्य देवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथ सप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी राहाते. जाणून घेऊया रथसप्तमीचे महत्व आणि पूजा विधी.
रथसप्तमीचे महत्व
रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो. असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते.
असे सांगितले जाते की, रथ सप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्य देव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते. स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते. मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल? “म्हणून त्यांनी देवाला विचारले.” तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. याचा अर्थ ‘सात घोड्यांचा रथ’ असा होतो.
रथसप्तमी २०२५ तिथी
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आज ४ फेब्रुवारी २०२५ पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होईल. तर ५ फेब्रुवारीला पहाटे २ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. उदयतिथीनुसार ४ फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाईल.
रथसप्तमी शुभ मुहूर्त
रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले जाते. पंचांगानुसार रथसप्तमीच्या दिवशी स्नान आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून २३ मिनिटांपासून ते सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल. या दिवशी तुम्ही पवित्र नदीत स्नान करु शकता.
रथ सप्तमीची पूजा विधी
रथ सप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा. एक भांडे पाण्याने भरा आणि त्यात गंगाजल घाला. यानंतर पाण्यात अक्षत, तीळ, रोळी आणि दुर्वा मिसळून या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य घ्या. अर्घ्य अर्पण करताना ‘ओम घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करा. यानंतर विधीनुसार सूर्यदेवाची पूजा करून सूर्य चालीसा किंवा सूर्य कवच पठण करा. यानंतर सूर्यदेवाची आरती करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला प्रार्थना करा. सूर्यपूजेनंतर काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडून द्या. या दिवशी गरजूंना अन्नदान करणे आणि दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी व्रत ठेवण्यालाही विशेष महत्त्व आहे.
रथसप्तमी मंत्र
रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करताना या मंत्रांचे पठण करा
ॐ सूर्याय नमः
ॐ घृणि सूर्याय नमः
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
ॐ हृीं रवये नम:
ॐ मरीचये नमः