मुंबई : संजय राऊत यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे, ते आरोपी आहेत. दखल-अदखल यातील फरक त्यांना नीट माहित आहे, असे प्रत्युत्तर भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत यांच्या दखल-अदखलतेची आम्हाला पर्वा नाही. त्यांना फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर द्वेषाने बोलायचे यापलीकडे कामधंदा नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, अर्थ आणि संकल्प याचा दुरान्वये संजय राऊतला कळत नाही. अर्थशास्त्र त्यांना माहित नाही. अर्थसंकल्प कसा करतात ते माहित नाही. जे पंतप्रधान मोदींनी १० वर्षात दाखवले त्याची सूतराम संजय राऊत यांना कल्पना नाही. सकाळी उठल्यावर केवळ कोल्हेकुई करणे हा त्यांचा नित्यक्रम आहे, असेही दरेकर यावेळी म्हणाले. राज्यातील समाजातील सर्व घटकांत शासनाच्या या अर्थसंकल्पातून लाभ होत असेल, अनेक विकास कामांसाठी शहरात, ग्रामीण भागात निधी दिला असेल त्यातून विकास होणार असेल तर संजय राऊत यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?, असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाल्याबाबत विचार, विकास आणि विश्वास असे ट्विट केले होते. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार ताकदीने पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताहेत. भाजपासोबत युतीचा धर्म निभावण्याचा प्रयत्न ते करताहेत. निश्चितपणे महायुती म्हणून बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही एकत्रित या महाराष्ट्राला दिशा देऊ, विकासाकडे नेऊ हेच दोन वर्षाच्या कारकिर्दीनंतर शुभेच्छा देताना बोलू शकतो असेही दरेकर म्हणाले.
राहुल गांधी, शरद पवार यांची संजय राऊतांनी वकिली करावी
शिवसेना उबाठा गटाचे मुखपत्र. टीडीपी आणि जनता दल(यु)चे मुखपत्र कधीपासून झाले. त्यांची वकिली करण्याची संजय राऊत यांना गरज नाही. टीडीपी, जनता दल(यु) आमच्यासोबत आहेत. विश्वासाने सोबत राहतील. राऊत यांनी राहुल गांधी, शरद पवारांची वकिली करावी. आणखी वकिली घेण्याच्या फंदात पडू नका तुमच्यावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही असा टोलाही दरेकरांनी संजय राऊत यांना लगावला.