Raver Crime News : सराईत गुन्हेगार पिस्टल व काडतुसांसह पोलिसांच्या जाळ्यात

रावेर : रावेर तालुक्यातील पाल गावानजीक गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगाराला रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपीकडून दोन गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस रावेर पोलिसांनी जप्त केले. तोफसिंग चतरसिंग चावला (२७, रा.धसली, ता. झिरण्या, जि. खरगोण, मध्य प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शनिवार, १० रोजी मध्यप्रदेशातील एक गुन्हेगार गावठी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल मिळाली. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेससमोर सापळा रचण्यात आला.

संशयीत तोफसिंग चतरसिंग चावला येताच शोध पथकाने झडप घालून त्याला अटक केली. आरोपीकडून ५१ हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे दोन पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल महेश मोगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, विकार शेख, अतुल गाडीलोहार यांच्या पथकाने केली.