Reserve Bank of India Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील काही बँकांसह एसजी फिनसर्व्ह लि. कंपनीवर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने एसजी फिनसर्व्ह लि. ला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित काही अटींचे पालन न केल्यामुळे कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसजी फिनसर्व्हला 28.30 लाख रुपयांचा दंड
आरबीआयच्या अहवालात कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षातील कंपनीच्या आर्थिक तपशीलांमध्ये नोंदणी प्रमाणपत्रशी संबंधित विशिष्ट अटींचे पालन न केल्याचे उघड केले आहे. जारी केलेल्या सीओआरमधील विशिष्ट अटींचे पालन न करूनही कंपनीने लोकांकडून ठेवी म्हणून पैसे घेतले आणि कर्ज दिले, असे रिझर्व्ह बँकेने एका अहवालात म्हटले आहे.
RBI च्या कारवाईत या बँकांचा आहे समावेश
याशिवाय इतर तीन सहकारी बँकांना काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. ज्यात जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड-भिंड, मध्य प्रदेश, दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव, महाराष्ट्र आणि श्री कलहस्ती को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लिमिटेड-आंध्र प्रदेश या बँकांचा समावेश आहे. यासोबतच रिझर्व्ह बँकेने अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँकेला 14 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आर्थिक निकष आणि ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) मजबूत करण्याच्या काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारची चूक लहान किंवा ग्रामीण भागातील बँकांमध्ये होते परंतु RBI ही बँकांची नियामक आहे आणि ती वेळोवेळी कारवाई करत असते.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. या संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय घेणे हा RBI चा उद्देश नाही. RBI वेळोवेळी वित्तीय संस्थांच्या नियमांवर लक्ष ठेवते आणि नियमांचे पालन न केल्यामुळे दंडासारखी कारवाई देखील करते जेणेकरून कंपन्या आणि बँका बँकिंग नियमांचे पालन करतील.