जळगाव : मनपा हद्दीतील तांबापुरा परिसरातील आरसीसी गटारीसाठी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना गुरुवार, २७ जून रोजी यांना देण्यात आहे.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्गा जातो. या महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर आदर्श नगर, गणपती नगर, फुकटपुरा, तांबापुरा अश्या दाटवस्तीचे रहिवासी राहत असतात. परिसरात मेहरुण तलावाच्या अतिरिक्त सांडव्याचा मुख्य नाला देखिल आहे. वरील बहुतांश परिसरात आरसीसी गटारी नसल्याने पावसाळ्यात झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून झोपड्यांमध्ये शिरते. तसेच यापूर्वी मागील पावसाळ्यात नाल्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे अतिरिक्त सांडपाणी या परिसरातील नाला परिसरातील नागरीकांच्या घरात शिरले होते. परिणामी त्यांना शासनाकडून मदत देण्यात आलेली होती. यात सुरुवातीच्या व शेवटच्या परिसरात आरसीसी गटार तयार झालेली आहे, मात्र या दोन्ही मधील भागात गटार नसल्यामुळे त्याचे अंदाजपत्रक महानगरपालिकेत बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित आहे. याकामी वेळोवेळी अंदाजपत्रक तरतुद शिल्लक नाही असे कारण सांगण्यात येत आहे. मात्र सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ६ कोटीची तरतुद प्रशासनाने केलेली आहे, तरीही मनपा फंडात निधी शिल्लक नसल्याचे देखिल उत्तर मिळते. यातून जळगाव शहरवासीयांची दिशाभूल केली जात आहे.
या परिसराची आपण समक्ष पाहणी करुन कामाची निकड लक्षात घेता मनपा हद्दीतील प्र.क्र. १५ अंतर्गत तांबापुरा परिसरातील आरसीसी गटारीसाठी रुपये ६० लक्ष मात्रची अंदाजपत्रकीय तरतूद करावी.