जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यात मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी राजा संकटात सापडला होता. मात्र आता राज्यात पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तसेच जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाले असून यामुळे राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (19 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुरुवातीला हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात येलो अलर्ट दिला होता. मात्र, बदलती परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. काल शुक्रवारी दिवसभर पावसाची रिमझिम सूर होती. यामुळे खरिपाच्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, आज देखील जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून २५ तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे.