---Advertisement---
नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. संक्रांतीच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबे पारंपरिकरित्या दागिने किंवा मौल्यवान धातूंची खरेदी करतात. मात्र यंदा उसळलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
बुधवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दारात मोठी वाढ नोंदवली गेली. सोन्याच्या दरात प्रति तोळा १,०९० रुपयांची वाढ झाली असून चांदीने तर एकाच दिवशी मोठी उडी घेतली आहे. चांदीचा भाव प्रति किलो १५ हजार रुपयांनी वाढल्याने दर जवळपास तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. संक्रांतीसारख्या शुभ दिवशीच दर इतक्या झपाट्याने वाढल्याने खरेदी करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर (विना जीएसटी) प्रति तोळा १,४३,६२० रुपये इतका नोंदवला गेला. २२ कॅरेट सोन्याचा भावही वाढून प्रति तोळा १,३१,६५० रुपये झाला आहे. या दोन्ही दरांमध्ये एका दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे.
चांदीच्या बाबतीतही चित्र वेगळे नाही. आज चांदीचा दर प्रति किलो १५,००० रुपयांनी वाढून २,९०,००० रुपयांवर पोहोचला आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता ओढा यामुळे चांदीच्या किमतींना जोर मिळत असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
जळगाव सराफा बाजारात मंगळवारीच दरवाढीचा मोठा फटका बसला होता. एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल ९,७८५ रुपयांची वाढ होऊन प्रति किलो भाव २,८३,२५० रुपये झाला, तर सोन्याचा दर प्रति तोळा १,४६,२६० रुपयांवर पोहोचला.
दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरता, भू-राजकीय तणाव, प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणांबाबतची अनिश्चितता आणि डॉलरमधील चढ-उतार यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. त्याचा थेट फायदा सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंना होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर पुढील काळातही दिसून येण्याची शक्यता असून, किमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









