Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव दिवसेगणिक वाढताना दिसत असून या आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवत असून, बुधवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर तब्बल १४०० रुपयांनी वाढले. त्यामुळे सोन्याचा दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही २ हजार रुपयांची वाढ झाली असून, यामुळे सोने आणि चांदी सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.
जळगाव सराफ बाजारातील नवे दर
बुधवारी जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर (विनाजीएसटी) ७८,०११ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर (विनाजीएसटी) ८५,१०० रुपये (जीएसटीसह ८७,६५३ रुपये) वर पोहोचला. त्याचबरोबर, चांदीचा दर प्रति किलो ९७,००० रुपये झाला असून, जीएसटीसह हा दर ९९,९१० रुपये झाला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सोने ८८ हजार रुपये (जीएसटीसह ९० हजार रुपये) पर्यंत जाऊ शकते.
हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा
सोन्या-चांदीच्या दरवाढीमागील प्रमुख कारणे
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलर सक्षम करण्यासाठी जाहीर केलेल्या परराष्ट्रीय धोरणांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिसून येत आहे. अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. परिणामी, पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे.
गेल्या पाच दिवसांत मोठी वाढ
गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात २,५०० रुपयांनी तर चांदीच्या दरात २,००० रुपयांनी वाढ झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी सोने ८२,९०० रुपये प्रति तोळा होते, तर बुधवारी हा दर ८५,१०० रुपये झाला. तसेच, चांदीचा दरही ९५,००० रुपये प्रति किलोवरून ९७,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून, बाजारातील पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.