जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण केले जाते. त्यातून अति कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची नोंद घेतली जाते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात १२९५ तीव्र कुपोषीत बालके आढळली होती. मात्र महिला व बाल बालकल्याण व आरोग्य विभागाने राबविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून कुपोषीत बालकांची संख्या मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत तीनशेने घटली आहे. सध्यास्थिती जिल्ह्यात ११२३ तीव्र कुपोषीत बालके आहेत. ३०० बालके तीव्र कुपोषणातून सामान्य यस्थितीत आली तर ५७६ बालकांमध्ये सुधारणा झाल्याची माहिती जि.प.चे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी दिली.
जिल्ह्यात ३ हजार ४३५ अंगणवाडी केंद्र आहेत. त्यापैकी ८४९ अंगणवाडी केंद्रात तीव्र कुपोषीत बालके आढळून आली आहेत. त्यात तीव्र कुपोषणातून मध्यम कुपोषणात २६८ बालके आली आहेत. तीव्र कुपोषणातून सामन्य स्थितीत ३०८ बालके आली आहेत. महिन्याभरात एकूण ५७६ बालकांमध्ये सुधारणा झाली तर नव्याने झालेल्या सर्वेक्षणात तीव्र कुपोषीत ४०४ बालके आढळली आहेत. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात ५ हजार ४४२ बालके मध्यम कुपोषीत असत्याचे सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र शासनाच्या पूरक आहारासह व इतर योजनांच्या माध्यमातून यातील २०५८ बालके सामान्य स्थितीत आली आहेत. तसेच नवीन १८३२ मध्यम कुपोषीत बालकांची नोंद मार्च महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात दिसून येते. जिल्हा कुपोषण मुक्त व्हावा, यासाठी शासनस्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. त्याअनुषंगाने महिला व बाल कल्याण विभागातर्फे कुपोषीत बालकांना पूरक आहारासह इतर योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
चाळीसगाव, जामनेर तालुक्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके
जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्पात सर्वाधिक १४१ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. त्या खालोखाल जामनेर तालुक्यात १३१ तर पाचोरा तालुक्यात १०७ बालके, भडगाव तालुक्यात ११५, यावल तालुक्यात ९७ बालके तीव्र कुपोषित सर्वेक्षणात आढळली आहेत. तसेच भडगाव तालुक्यात ७४ तर पारोळ्यातही ७९ बालके कुपोषित असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
जिल्हाभरात प्रत्येक महिन्याला आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून तीव्र व मध्यम कुपोषित बालकांचे सर्वेक्षण केले जाते. या दोन्ही प्रकारांमध्ये आढळलेल्या बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. जेणेकरून या बालकांचे वजन वाढून त्यांचे आरोग्यदृष्ट्या सदृढ होण्यास मदत होईल.
-देवेंद्र राऊत, जिल्हा कार्यक्रम
अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प., जळगाव