अमळनेर : येथील एका जेष्ठ नागरिकाने घर नावावर करुन देण्यास नकार दिल्याने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार १२ रोजी घडला असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ख्वाजा हसन अब्दुल गणी (७२ , रा. बाहेरपूरा महोल्ला, अमळनेर) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवार १२ रोजी सकाळी १० वाजता ते घरी होते. यावेळी गुलाम अब्दुल रहेमान तेली याने त्यांच्या आठ साथीदारांसह (रा. गांधीनगर, अमळनेर) घरासमोर येऊन शिवीगाळ करत राहते घर नावावर करून देण्यास बळजबरी केली. मात्र ख्वाजा हसन अब्दुल गणी यांनी यास नकार दिला.
नकार देताच गुलाम अब्दुल रहेमान तेली, रफिक अब्दुल रहेमान तेली, रहिम रमजान तेली, कांती रमजान तेली, जिशान कमाल तेली, असीम कमाल तेली, बाबु रमजान तेली, सादीक बाबु तेली, आसीफ बाबु तेली (सर्व रा. गांधी नगर, अमळनेर) यांनी ७२ वर्षीय वृध्द ख्वाजा गणी यांना मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून दिले. त्यानंतर आग लावून पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला मात्र ते यातून बालंबाल वाचले. याप्रकरणी ख्वाजा हसन अब्दुल गणी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मंगळवार १३ रोजी अमळनेरपोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.