Thane Crime News : ठाण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका नवविवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने मित्रासह अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर तिला तब्बल १५ दिवस एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. पीडित महिलेने प्रसंगावधान राखत कशीबशी सुटका करून घेतली आणि आपल्या आईवडिलांकडे जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी त्वरित पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती सासरच्या लोकांपासून वेगळे राहत होते. मात्र, ३० जानेवारी रोजी तिच्या ५२ वर्षीय सासऱ्याने तिला आईवडिलांच्या घरी सोडण्याचे निमित्त करून सोबत नेले. परंतु, पालकांकडे न नेता, तिला थेट स्वतःच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि त्याच्या मित्रालाही तेथे बोलावले. त्यानंतर दोघांनी मिळून तिच्यावर सतत १५ दिवस अत्याचार केला.
या दरम्यान, पीडितेने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर जर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आईवडिलांना ठार मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. त्यामुळे भीतीपोटी पीडित महिला गप्प बसली.
एक दिवस सासरा झोपला असताना पीडितेने संधी साधली आणि कोणालाही न कळता घराबाहेर पडली. ती थेट तिच्या आईवडिलांकडे पोहोचली. घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीय हदरून गेले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिसांनी आरोपी सासऱ्यासह त्याच्या मित्राविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६४, १२७(४), ३५१(३), ७४ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.
नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कामथ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपींच्या मागावर असून त्यांना लवकरच गजाआड केले जाईल.”