‘सापेक्षता वाद’ व्यासांचा की, आईन्स्टाईनचा?

– प्राचार्य प्र. श्री. डोरले

मागील लेखात आपण डॉ. प्र. न. जोशींनी महर्षी व्यासांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेची केलेली प्रशस्ती वाचली.

जगातील विविध विषयांतील, क्षेत्रांतील, ज्ञानमहर्षी व्यासांच्या प्रतिभेेने, ज्ञानाने, प्रज्ञेने कसे स्पर्शित आहे, आवरीत आहे याचे विवेचन त्यांनी केले आणि त्यामुळे ‘व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम्’ ही म्हण कशी सार्थ आहे, याचे प्रत्यंतर त्यांनी दिले. महर्षी व्यासांचे भारतीय संस्कृतीच्या ज्ञानक्षेत्रात, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एक आगळे असे स्थान आहे. त्यांनी महाभारतासारखे महाकाव्य निर्माण करून संपूर्ण मानवजातीला उपकृत करून सोडले आहे.

जीवनातील अज्ञान-अंधकाराचा कायमचा विनाश करणारा ज्ञानाचा गीतारूपी नंदादीप ही व्यासांचीच किमया आहे. या महाकाव्याच्या जोडीने त्यांनी सामान्यजनांसाठी गोष्टीरूपाने, कथारूपाने संस्कारप्रवण अशा कथा, प्रवचन, संवाद या विविध पद्धतीने जीवन समृद्ध करणारे तत्त्वज्ञान निर्माण केले. गत सहस्रावधी वर्षांच्या वाटचालीत पुराणिकांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी ते सामान्यजनांच्या झोपडीपर्यंत पोहोचविले. त्या कथांनी केलेल्या संस्कारातून भारतीय संस्कृती (ए वे ऑफ लाईफ) निर्माण झाली. महर्षी व्यासांचे हे कर्तृत्व लक्षात येण्यासाठी आपण श्रीमद्भागवत पुराणातील एक कथा पाहू. ही कथा भागवतातील नवव्या स्कंधातील तिसर्‍या अध्यायात आली आहे. ती थोडक्यात अशी-

शर्याती नावाचा राजा होता. त्याला उत्तानबर्हि, आनर्त आणि भुरिषेण अशी तीन मुले होती. आनर्ताला रेवत नावाचा मुलगा होता व त्याच्या मुलाचे नाव होते कुकुद्मी. या कुकुद्मीला रेवती नावाची एक सुंदर मुलगी होती. ती त्याची अतिशय लाडकी होती. ती उपवर झाली. तिला तिच्याचसारखा सर्वगुणसंपन्न, रूपगुणसंपन्न पती मिळावा, अशी त्याची हार्दिक इच्छा होती. कोणत्याही पित्याची ती असतेच. ‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात आधीच बांधल्या गेलेल्या असतात.’ या परंपरेवर राजा कुकुद्मी याचा विश्वास होता. आजही आपण सहजपणाने म्हणतोच ना की, ‘मॅरेजेस आर सेटल्ड् इन हेवन?’

(नम्रप्रार्थना- ‘कामांधतेचे भक्ष्य बनून कोणत्याही अल्ताफशी ‘लव्ह जिहाद’च्या गोंडस नावाखाली ‘श्वान संस्कृतीला’ साजेशा बेशरमपणाने शरीरसंग करण्यास चटावलेल्या, सरावलेल्या, हिंदू संस्कृतीच्या सीता-सावित्रीच्या अनादि महान परंपरेला विस्मृतीत गाडणार्‍या तसेच कामांध आणि हिंदुद्वेष्ट्या शत्रूचा वासनेने बरबटलेला ‘कामुक’ स्पर्श आपल्या पवित्र शरीराला होऊ नये यासाठी राणी पद्मिनीसोबत हजारो राजपूत रमणींनी चितोडगड येथे केलेला ‘जोहार’ या ऐतिहासिक ‘सत्याला’ लाथाडणार्‍या, ज्या कुटुंबात आणि ज्या समाजात जन्माला आलो त्याला ‘काळिमा फासणार्‍या’ वृत्तीच्याच फक्त युवतींनी वरील म्हणीचा वा श्रद्धायुक्त परंपरेचा हुशारीने समर्थनाचे तत्त्वज्ञान म्हणून गैर-उपयोग करू नये ही विनंती.)

भूतलावर येणार्‍या प्रत्येकाचे भाग्य हे ब्रह्मदेवालाच फक्त माहीत असते. म्हणून राजा कुकुद्मी हा आपली कन्या रेवती हिला घेऊन सरळ ब्रह्मदेवाकडे गेला. त्यावेळी स्वर्गात दशदिनोत्सव चालू होता. ब्रह्मदेव त्या उत्सवाच्या गडबडीत होते. तो उत्सव संपेपर्यंत राजा रेवतीसह तेथेच थांबला. त्याला पृथ्वीलोकावरील म्हणजे मृत्युलोकावरील कालगणनेची सवय. त्याला वाटले आपण स्वर्गामध्ये ‘काहीच दिवस’ तर थांबलो आहोत. आता ज्या कामासाठी आलो आहोत ते करावे आणि परत जावे म्हणून तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि कोणत्या कामासाठी आलो होतो, याची कल्पना त्याने ब्रह्मदेवाला दिली. ब्रह्मलोकात तो बराच काळ राहिला आहे. हे ब्रह्मदेवाला माहीत असल्याने ते हसून त्याला म्हणाले- (मुळातील श्लोक असा)-

तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेद्यत्।

तच्छ्रुत्वा भगवान ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह॥31॥

अहो राजन् निरुद्धास्ते कालेत हृदि ये कृताः।

तत्पुत्रपौत्रनफ्तृणां गोत्राणि च न श्रृण्महे॥32॥

कालोऽभियातास्त्रिणव चतुर्युग विकल्पितः।

तद् गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः॥33॥

म्हणजे- राजा कुकुद्मीने ब्रह्मदेवाला स्वतःच्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावर हसून ब्रह्मदेव म्हणाले- ”हे राजन्! तू ज्या लोकांविषयी मनात विचार केला असशील आता त्या लोकांपैकी भूतलावर कुणीही त्यांचे आप्त स्वकीय, पुत्र, पौत्र, नातू, पणतू, त्यांचे कुळ काहीही शिल्लक राहिले नसेल. कारण स्वर्गातील तुझ्या वास्तव्याच्या ‘कालावधीत’ मृत्युलोकातील म्हणजे पृथ्वीवरील सत्तावीस चतुर्युगीचा ‘कालावधी’ संपून गेला आहे. तेव्हा तू परत जा आणि नारायणाचा अंशावतार असलेल्या बलरामाला ‘कन्यारत्नमिदं राजन् नररत्नाय देहि भोः’ तुझी कन्या अर्पण कर.” त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राजा कुकुद्मी परतला आणि त्याने रेवतीचा विवाह यादवकुलभूषण बलराम यांच्याशी लावून दिला…

अशी ही साधी पण चमत्कारिक वाटणारी पुराणातील कथा आहे. साध्या वाटणार्‍या या कथेत एक वैज्ञानिक सिद्धांत लपलेला आहे. आधुनिक परिभाषेत म्हणजे विज्ञानाच्या परिभाषेत हा सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ आहे आईन्स्टाईन आणि त्याने मांडलेल्या या सिद्धांताला सर्व जग ‘सापेक्षतावादाचा सिद्धांत’ (थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी) या नावाने ओळखतात. त्या सिद्धांताच्या मूलभूत संकल्पना समजून येण्याचा प्रयत्न करू.

आईन्स्टाईनचा सिद्धांत

1905 मध्ये Einstein आईन्स्टाईनने हा सिद्धांत मांडला आणि गॅलेलिओ, न्यूटनच्या काळापासून चालत आलेल्या ‘मेकॅनिस्टिक व्ह्यू ऑफ द वर्ल्ड’ला धक्काच बसला. कारण त्यात ‘कालतत्त्व’ (टाईम) आणि ‘स्थल-अवकाश तत्त्व (स्पेस) हे स्वतंत्र आणि शाश्वत आहे, हे गृहीत धरण्यात आले होते. पण आईन्स्टाईनने ते स्वतंत्र आणि शाश्वत नसून ‘परस्परसापेक्ष’ (रिलेटिव्ह) आहेत, हे सिद्ध करून दाखविले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे कालतत्त्व हे गतिसापेक्ष असते. म्हणजे एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाने म्हणजे (एका सेकंदाला 186000 मैल या वेगाने) गतिमान झाली तर घड्याळाचे कालमापन शून्यांवर येते. त्यासाठी त्याने जुळ्या भावांची गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो- ”समजा दोन जुळी मुले आहेत. त्यापैकी एकाला अंतराळ प्रवासासाठी अवकाश यानामध्ये पाठविले. यानाचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका आहे. त्या अवस्थेत जर तो दोन वर्षांनंतर परतला तर अंतराळ यानातील भावाचे वय दोनच वर्षाचे असेल, पण पृथ्वीवरील भावाचे वय मात्र वीस वर्षांचे असेल. अशी ही अंतरिक्ष व पृथ्वी यातील कालतत्त्वाची ‘परस्पर सापेक्षता’ आहे.”

…इफ द स्पेसाशिप हँड ए व्हेलॉसिटी इव्हन क्लोजर टू दॅट ऑफ लाईट अँड इट ट्रॅव्हल्स ए मंथ ऑर इअर बट इन धिस शॉर्ट पिरियेड द एज ऑफ अर्थ ट्विन वुईल बी ट्वेंटी इअर्स. (प्रॉबॅबॅलिटिज ऑफ द क्वाँटस् वर्ल्ड – पेज 65).

वरील कथेवरून सहजपणे लक्षात येणारी पुढील तत्त्वे आहेत. ती अशी-

• पृथ्वी आणि अंतराळ यांच्यातील कालगणनेचे मापन भिन्न आहे.

• कोणतीही व्यक्ती ही अधिक गतीने पृथ्वीपासून अंतराळात जितकी तितकी दूर जाईल त्या त्या प्रमाणात अंतराळातील कालतत्त्व हे मंद-मंदतर-मंदतम या क्रमाने शून्यत्वाकडे जाईल. शेवटी ‘कालतत्त्व’ क्रियान्वित होणेच बंद होईल.

• वरील परिणामाचे व्यावहारिक द़ृश्य म्हणजे पृथ्वीवरून निघताना जी वयाची, देहाची अवस्था असेल तीच कायम राहील. कारण काळाचा परिणामच नाहीसा झालेला असल्याने काळाचा अटळ परिणाम जी बाल- युवा- वृद्धत्व- जर्जरत्व व मृृत्यू ही कालशृंखला जी पृथ्वीवर अस्तित्वात आहे, तीच नष्ट होईल किंवा शून्यत्वाकडे जाईल.

• अंतराळातील वा अवकाशातील अंतर जितके दूरगामी तितक्याच पटीने पृथ्वीवरील वयाचे वा कालाचे आधिक्य गणनेच्या दृृष्टीने.

याप्रमाणे Einstein आईन्स्टाईनने वरील कथेद्वारा पृथ्वी आणि अंतरिक्ष, काल आणि अवकाश या सृष्टितत्त्वाचे ‘परस्पर सापेक्ष’ (रिलेटिव्हली) असलेले मूलभूत स्वरूपच एका नव्या स्वरूपात आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत मांडल्यामुळे व गणिताने तो सिद्ध केल्यामुळे विज्ञान युगाचा म्हणजे आधुनिक ‘स्पेस युगाचा’ प्रारंभ झाला, असे समजायला हरकत नाही.

आईन्स्टाईनने मांडलेल्या वरील सैद्धांतिक निष्कर्षांना समोर ठेवून आपण श्रीमद्भागवत पुराणातील कथेचा विचार केला तर तेच निष्कर्ष तंतोतंत जुळतात वा निघतात, हे आपल्या सहज लक्षात येईल.

• राजा कुकुद्मी आणि त्याची कन्या रेवती हे अनेक प्रकाशवर्षे दूर असलेल्या ब्रह्मलोकात जाऊन तेथील उत्सव संपेपर्यंत निवास करतात. दोन्हीकडील कालमापनाचे सापेक्षत्व ब्रह्मदेव त्यांना विदित करतो की, पृथ्वीवरील सत्तावीस चतुर्युगी आटोपून गेल्या आहेत. म्हणजे 17 कोटी 49 लक्ष 60 हजार मानवी वर्ष.

• अनेक प्रकाशवर्षे प्रदीर्घ अंतरावर गेल्यामुळे राजा आणि त्याची कन्या रेवती यांचे कालतत्त्वावर आधारित वये वाढलीच नाहीत.

• चतुर्युगीच्या कालगणनेचा वरील हिशेब पाहिला तर ब्रह्मदेवाने त्याला जे सांगितले की, ‘तुझ्या वंशातील तसेच त्या काळातील आज कोणीही अस्तित्वात नाही’ हे विधान परस्पर सापेक्षत्व सिद्ध करणारेच ठरते.

Einstein आईन्स्टाईनने ‘कालतत्त्व’ (टाईम) आणि अवकाश (स्पेस) यांचे परस्परांशी असलेल्या सापेक्षत्वाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामुळे विज्ञानात आमूलाग्र बदल झाला. त्यासाठी 1905 पर्यंत वाट पाहावी लागली.

महर्षी व्यासांनी हजारो वर्षांपूर्वी श्रीमद्भागवत पुराणाची रचना केली आणि त्यातील एका अध्यायातील एका कथेच्या निमित्ताने ‘टाईम अँड स्पेस’चे परस्पर सापेक्षत्व मांडले.

पुराणातील सृष्टी उत्पत्ती सिद्धांताचेच आधुनिक परिभाषेत विज्ञान महर्षी स्टीफन हॉकिंगने ‘द थेअरी ऑफ द ओपन इन्फ्लेक्शन’ या नावाने पुनरुज्जीवन केले. आज ते जगमान्य झाले आहे.

पुराणातील नद्या, पर्वत, भूगोलाचे संशोधन करणार्‍या पाश्चात्त्य संशोधनांना हिंदू संस्कृतीच्या विश्वव्यापी प्रसरणशीलतेची कल्पना आली. पुराणातील मेरू पर्वत हा वास्तव आहे, हे सिद्ध झाले आहे. पश्चिम सैबेरियामध्ये असलेला ‘अलताई पर्वत’ हाच पुराणातील मेरू पर्वत आहे. कर्नल विलफर्ड म्हणतात- ‘पुराणातील रम्यक किंवा रमणक वर्ष म्हणजे रोम वा इटली होय. क्रौंचद्वीप म्हणजे बाल्टिक समुद्राजवळचा प्रदेश. क्रौंचद्वीपाच्या ज्या भागात स्कंदांनी वस्ती केली तो प्रदेश स्कंदनामी म्हणजे स्कँडेनेव्हिया समजावा. पुष्करद्वीप म्हणजे आईसलँड. पुष्करद्वीपात सहा-सहा महिने दिवस-रात्र असतात, असे पुराणात म्हटले आहे. ते याला लागू पडते. (भारतीय संस्कृती कोष 5 वा खंड)

वानगीदाखल, प्रातिनिधिक स्वरूपात, पुराणातील ज्ञानगंगोत्रीचे काही थेंब या लेखांच्या रूपाने आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ते थेंब पुराणरूपी अमृतकुंभातील आहे. सहस्रावधी वर्षांपासून या ज्ञानामृताचे थेंब प्राशन केल्यानेच जगातील प्राचीनतम संस्कृती, हिंदू जीवन पद्धती सर्व प्रकारच्या आक्रमणांना तोंड देत, सर्व झंझावाताला पचवून टिकली आहे.

आपली ‘पुराणातील वांगी’ आता जागतिक स्तरावर ज्ञानाच्या क्षेत्रात चांगलीच ‘खपून’ राहिली आहेत. त्यामुळे आता आपल्याला साहेबांनी निर्माण केलेल्या ‘न्यूनगंडातून’ मुक्त व्हायला हरकत नाही. त्यामुळेच आपण ‘स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः’ हा आपल्या पूर्वजांनी केलेला दैवी संकल्प (डिव्हाईन मिशन) पूर्णत्वाला नेऊ शकू.

– 9860296131

(लेखक विचारवंत आणि माजी प्राचार्य आहेत)