नवसाला पावणारे 350 वर्ष पुरातन भवानी माता मंदिर, 100 वर्षानंतर पुन्हा तीन मजली भव्य मंदिराची उभारणी

by team

---Advertisement---

 


जळगाव शहरात पुरातन मंदिर कुठे? असे प्रश्न कुणाला पडलाच तर ठामपणे सराफ बाजारातील भवानी मातेचे मंदिर डोळ्यासमोर उभे राहते. नवसाला पावणाऱ्या या भवानी मातेचे मंदिर 350 वर्ष जुने असून जिर्णोध्दाराच्या 100 वर्षानंतर मंदिराची पुन्हा नव्याने उभारणी केली जात आहे. जळगावसह पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड आस्था असलेल्या भवानी मातेच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सव काळात लाखो भाविकांची गर्दी होत आहे.

नवरात्रौत्सवानिमित्त आदिशक्ती मातेचा जागर सध्या सर्वत्र सुरू आहे. नवरात्रीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सराफ बाजारातील पुरातन भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची दैनंदिन प्रचंड गर्दी होत आहे. मंदिर परिसरात गत 175 वर्षापासून मोठी यात्रा भरली असून जळगाव जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहेत.

मंदिराची अशी आहे आख्यायिका

भवानी मातेच्या मंदिराबाबत मंदिर जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी माहिती दिली. 350 वर्षापूर्वी एक सदगृहस्थ दरवर्षी तुळजापूर येथे भवानी मातेच्या दर्शनाला जात असत. कालांतराने वय झाल्याने त्यांचे दर्शन शक्य होत नव्हते. त्यावेळी भवानी मातेने मीच भक्ताच्या दर्शनासाठी येते असा दृष्टांत दिला. त्यानंतर देवीचा बाण आताच्या सराफ बाजारात (पूर्वी गावाबाहेरचे ठिकाण) असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली स्थापन करण्यात आला. त्यावेळेपासून भवानी मातेचे पूजन होऊ लागले. पुढे सन 1924 मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत मंदिराचे व्यवस्थापक शंकरलाला अबोटी यांनी मार्गदर्शनाखाली मंदिराचा जिर्णोध्दार केला. पं. नंदकुमार त्रिपाठी यांची तिसरी पिढी मातेच्या सेवेत आहे. या जिर्णोध्दाराला 100 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या भींती आणि मंदिराचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे.

नवीन मंदिर राहणार तीन मजली

सन 1956 मध्ये या मंदिराची नोंदणी झाली आहे. 100 वर्षानंतर मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे. हे मंदिर आता तीन मजली राहणार असून पहिल्या मजल्यावर मंदिर आणि मंदिराचा इतिहास लिहीला जाणार आहे. तसेच महादेव आणि हनुमानाचे गर्भगृह विस्तारीत करण्यात येणार असून पुजेसाठी बसण्याला मोकळी जागा केली जात आहे. दुसऱ्या मजल्यावर पुजारींसाठी निवासाची व्यवस्था आणि देवीच्या नैवेद्यासाठी स्वयंपाकगृह बनविले जात आहे. तिसऱ्या मजल्यावर मंदिराशी संबंधित साहित्य ठेवले जाणार आहे.

भवानी मातेच्या मंदिर उभारणीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 50 लाखांचा निधी दिला आहे. मात्र मंदिर निर्माणाच्या पूर्ततेसाठी 75 लाखांचा अधिकचा निधी लागणार असून आ. सुरेश भोळे यासाठी प्रयत्नशील आहेत.

असे आहेत विश्वस्त

भवानी माता मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किसनलाल पुरोहित असून किर्तन, जिर्णोध्दार आणि यात्रा समितीचे अध्यक्ष श्रीकांत खटोड हे आहेत. तसेच राजू बांगर, विनोदराज मणियार, विजय बियाणी, चंदन अबोटी यांचा देखिल यात समावेश आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---