शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जळगावच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर

जळगाव । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर गुरुवारी रात्री शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी लोकसभेतील पराभवानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा ठराव संमत करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रसंगी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अरूणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील यांच्यासह अन्य नेते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जामनेरचे डॉ. मनोहर पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. तर डॉ. सतीश पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतांना जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. दरम्यान, नवीन जिल्हाध्यक्ष ओबीसी असण्यासह इतर समाजघटकांना कार्यकारिणीत स्थान मिळावे, अशी सूचना पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, डॉ. सतीश पाटील यांनी एक जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नेमावेत अशी सूचना देखील याप्रसंगी केली. तर रवींद्रभैय्या पाटील यांनी राजीनामा वरिष्ठांना पाठवून दिल्याचे नमूद केले. तर आता जिल्हाध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.