जळगाव : संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी आज विभागीय कार्यशाळा जळगाव येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या अनुषंगाने कार्यशाळेचे यंत्र अभियंता किशोर पाटील व एम इ निलेश चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. जळगाव विभागीय कार्यशाळेच्या आवारात प्रचंड समस्या निर्माण झालेल्या असून तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवणे हे क्रमप्राप्त असताना देखील फॅक्टरी इन्स्पेक्टरने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
कार्यशाळेचा आवारात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून नियमित साफसफाई करा. कार्यशाळेच्या आवारात दोन सार्वजनिक शौचालय सुविधागृह उपलब्ध असून त्यात नियमित साफसफाई होत नाही. शौचालयाचे दुर्गंधीयुक्त पाणी गटारीत सोडणे आवश्यक असताना ते पाणी आवारातच सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. काही स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत तर दिव्यांगासाठी सुद्धा राखीव स्वच्छतागृह नाही. विभागीय भांडारात कामाचा व्याप जास्त असल्याने सहाय्यक उपलब्ध करून द्यावेत. कार्यशाळा फ्लोरिंगचे वरील पत्रे लिक असल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात फ्लोरिंगवर साचते. हे लिकेज बंद करून फ्लोरिंगचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्यामुळे जॅक सटकल्यास, पाय घसरल्यास किंवा इलेक्ट्रिक शॉक लागल्यास एसटी प्रशासन जबाबदार राहील. अवजड सामान वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक क्रेनची आवश्यकता आहे. याची पूर्तता करण्यात यावी. विभागीय कार्यशाळेत बऱ्याच सेक्शनमध्ये अत्याधुनिक सामग्रीची आवश्यकता आहे, याबाबत कार्यवाही करण्यात यावी. मल्टी ट्रेड संदर्भातील अन्याय दूर झाला पाहिजे. पगार फिक्सेशन संदर्भात प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत उपलब्ध करून द्यावी व आस्थापना शाखेतील संबंधित लिपिकाने महिन्यातून एकदा तरी विभागीय कार्यशाळेला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या शंकेचे निरसन करावे. लोहार सेक्शन परिसरात वॉटर कुलर बसवण्यात यावे.
विभागीय कार्यशाळेतील या चर्चेत संयुक्त कृती समितीचे सर्वश्री आर के पाटील, प्रशांत चौधरी, गोपाळ पाटील, गोकुळ पाटील, मोहन बिडकर, योगेश सपकाळे, प्रदीप दारकुंडे यांनी भाग घेतला. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. कृति समितीकडून प्रशासनाचे आभार मानण्यात आले.