Yawal News: धुळे-जळगाव बससेवा पूर्ववत करा; अन्यथा आंदोलन; प्रवाशांचा इशारा

यावल : गेल्या अनेक वर्षांपासून दहिगाव-सावखेडासीमसाठी धुळे आगाराची धुळे-दहिगाव ही बस सेवा सुरू होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ती बंद झाल्याने ही बस पूर्ववत सुरू करावी. तसेच यावलवरून चुंचाळेमार्गे जळगाव ही बस सुद्धा गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. या दोन्ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी चुंचाळे-नायगाव ग्रामस्थांनी केली आहे.  या बसेस बंद असल्याने  विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे हाल होत आहेत. बससेवा सुरू केली नाही तर प्रसंगी प्रवासी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.

मुक्कामी बसची मागणी
अनेक वर्षापासून धुळे आगाराने चोपडा-किनगावमार्गे दहिगाव- सावखेडसीम ही बस सेवा मुक्कामी सुरू केली व बसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसादही मिळत होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सावखेडासीम येथील नायगाव रस्त्यावरील लहान पुलाचे काम सुरू झाल्याने ही बस सेवा नायगावपर्यंतच सुरू आहे. आता दोन आठवड्यापासून हा मार्ग मोकळा झालेला असत्याने कुठलाही अडथळा नाही. धुळे आगाराने दहिगाव मुक्कामी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. ही बस सेवा बंद असल्याने दहिगाव-सावखेडासीम येथील प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्यांना यावलमार्गे प्रवास करावा लागत आहे. यावलवरून चुंचाळे नायगाव जळगाव जाणारी बस सेवा कोरोनापासून बंद आहे. तर आगारात कमी बसेस असल्याचे कारण देत आगार व्यवस्थापक दिलीप महाजन हे ग्रामीण भागावर अन्याय करत असल्याची भावना चुंचाळे, नायगाव या गावातील विद्यार्थी व पालकांची आहे.

बससेवा सुरू करणार

धुळे-दहिगाव ही गाडी धुळे डेपोची असून यावल डेपोची नाही. यावल डेपा मध्ये गाड्यांची संख्या कमी आहे. ऑक्टोबरमध्ये नवीन गाड्या येणार असून ज्या कमी उत्पन्नाच्या फेऱ्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय डेपोने घेतला होता, पण जर प्रवाशांची विद्यार्थ्यांची मागणी असल्यास त्यावर निश्चित विचार करू व प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर यावल, चुंचाळे, नायगावमार्गे किनगाव जळगाव गाडी आपण लवकरच सुरू करू, असे आगार प्रमुख दिलीप महाजन म्हणाले.