धरणगाव : गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी धरणगाव तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे बैठे पथक गिरणा नदीपात्रात कार्यरत करण्यात आले आहे. यासाठी शुक्रवारी (ता.४) मौजा बांभोरी प्र.चा येथे ग्राम दक्षता समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली.
बांभोरी येथील गिरणा नदीपात्रातून कोणत्याही प्रकारची अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होणार नाही, हे महसुल विभागाचे व ग्रामदक्षता समितीचे कर्तव्य आहे. यासाठी धरणगाव तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे बैठे पथक गिरणा नदीपात्रात कार्यरत आहे. याकामी संपूर्ण गावाची साथ आवश्यक आहे, असे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीत महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष, सदस्य यांनीही एकत्रित येऊन नदीपात्रात चोरी होणार नाही, यासाठी खबरदारी घेऊन कार्यवाही करावी. वाळू उत्खनन करणाऱ्या व्यक्तींमुळे गावातील पाणीपुरवठादेखील प्रभावित होणार असल्याने गावातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन सूर्यवंशी यांनी केले. आवश्यक तेथे पाळधी येथून पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, अवैध वाळू उत्खनन व वाहतूकमुळे गुन्हेगारी वाढते. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस विभागामार्फत सर्व प्रकारच्या कारवाईवेळी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी दिले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी अमोल पाटील, तलाठी मनोहर बावीस्कर, बांभोरीचे सरपंच तथा ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष सचिन बिऱ्हाडे, ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्था उपस्थित होते.
Sand mining : गिरणा नदीपात्रातून वाळू उत्खनन थांबणार ? महसूल विभागाचे बैठे पथक नदीपात्रात कार्यरत
