जळगावकरांना दिलासा ! तांदळाच्या दरात घट, आता ‘इतका’ झाला प्रति किलोचा दर

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेत तांदळाच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काली मूंछ, वाडा कोलम आणि सुगंधी चिनोर यासारख्या तांदळाच्या प्रकारांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

होलसेल व किराणा व्यापारात नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, तुमसर तसेच छत्तीसगड, पंजाब आणि हरयाणा राज्यांतून तांदळाचा पुरवठा होत आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार भागातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

गेल्या वर्षी शासनाच्या निर्यात धोरणामुळे आणि अतिवृष्टीमुळे तांदळाचे दर गगनाला भिडले होते. मात्र, यंदा तसा कोणताही धोका नसल्याने पावसाळ्यापर्यंत तांदळाच्या दरात स्थिरता राहील, अशी अपेक्षा आहे.

प्रमुख तांदळाचे सध्याचे दर (प्रति किलो )

  • काली मूंछ: ५० ते ५२ रुपये (२०२४: ६० ते ६२ रुपये)
  • वाडा कोलम: ५५ ते ५८ रुपये (२०२४: ६३ ते ६५ रुपये)
  • बासमती: १०० ते १४० रुपये (२०२४: १२० ते १६० रुपये)
  • खिचडी (मसुरी): ३४ ते ३६ रुपये (२०२४: ३७ ते ३८ रुपये)

जळगावच्या बाजारपेठेत चांगल्या प्रतीचा तांदूळ कमी दरात मिळत असल्याने ग्राहकांचा कल खरेदीकडे वाढला आहे. यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून व्यापाऱ्यांकडून पुढील आठवड्यात आणखी तांदळाच्या प्रकारांची आवक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.