पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

तरुण भारत लाईव्ह । डॉ. अरुणा धाडे । सन 1893ला पुण्यात आलेल्या भयंकर प्लेगच्या साथीत त्यावेळचे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. मुलाच्या अशा असामायिक निधनाने शेटजींच्या संसारातील साखरगोडी अचानक संपली. त्यांचं विश्व बेचव झालं. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांना धीर दिला. आकस्मित झालेल्या दुःखप्रपाताला तोंड देण्यासाठी अध्यात्मिक उपाययोजना सांगितली. त्यासाठी एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करून मागवली. त्यांची रोज पूजा करायला सांगितली. पुत्र वियोगाचे असीम दुःख हृदयात असताना शेटजींनी आणि त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाईंनी पूजेला सुरवात केली. आता नित्यनियमाने ते दोघेही आपला बहुतांश वेळ पूजाअर्चा करण्यात घालवू लागले. त्यामुळे मुलाच्या जाण्याचे दुःख असले तरी नित्याच्या पूजेत मन गुंतू लागले. आपल्या पुत्राला गणपतीत शोधू लागले. पुत्राला गणपतीत शोधता शोधता कधी गणपतीच आपला पुत्र झाला, त्यांचं त्यांना कळलंच नाही. गुरूने त्यांना दुःखाच्या जळजळत्या निखार्‍यातून अलगद काढून आध्यात्मच्या शीतल वनराईत आणून पोहचवले होते. त्यात ते रमले होते. मुले जशी आपल्या माता-पित्याचा सांभाळ करतात, त्यांचं नाव उज्ज्वल करतात त्याप्रमाणे हे दैवत तुमचे नाव उज्ज्वल करेल, असा आशीर्वाद गुरूंनी त्यांना दिला. अगदी त्याप्रमाणे गणपतीने त्यांना दुःखातून बाहेर काढले. त्यांचा सांभाळ केला. एवढेच नाही तर आपल्या नावापुढे श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे नाव लावले. आज पुण्याच्या गणदेवतेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या नावानेच ओळखलं जातं. भारतातील असंख्य गणपती मंदिरातील हे एकमेव मंदिर असावे. जिथे देवता त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखली जाते.

देशभर स्वातंत्र्य चळवळ जोर धरू लागली, तेव्हा लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्रित करण्यासाठी पारंपरिक घरगुती गणेशोत्सवाला सार्वजिनिक उत्सवाचे स्वरूप दिले. तिथून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे ह्या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती असं म्हणतात. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु गणेशोत्सवाची परंपरा पुढे सुरू राहिली.

मंदिरातील आताची मूर्ती ही; सन 1896 सालच्या मूळ मूर्तीच्या जागी सन 1967च्या अमृतमहोत्सवी वर्षी नव्याने बसविण्यात आली. ह्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्‌य तिच्या अत्यंत देखण्या रूपात आहे. सदैव आनंद स्वरूप भासणारी ही मूर्ती कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून साकारलेली आहे. असा उल्लेख आहे की मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना ‘सूर्यग्रहण’ आले. त्या ग्रहणाचे निमित्त साधून ‘योग्य घटिकेत’ मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले गेले. असे केल्याने मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि मूर्तीला देवत्व प्राप्त होईल, अशी शिल्पकार शिल्पी यांची श्रद्धा होती.

आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर केवळ पुणे शहरातच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. असंख्य गणेशभक्त भारतातून, देशविदेशातून गणेशाच्या दर्शनाला येतात. यात अगदी सामान्य भक्तांपासून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. दहा दिवसीय गणपती उत्सवात विशेष दर्शनाचा मान त्या त्या वेळच्या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना दिला जातो.

रस्त्याने जाता येता लखलखत्या सोन्या चांदीच्या जवाहिरीने सजविलेला, 10 मिलियन रकमेचा विमा उतरवलेला देवबाप्पा मंदिराच्या बाहेरून सहज स्पष्ट दर्शन देतो. तितक्याच सहजतेने भक्त पण नतमस्तक होतो.