भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने आपली आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा दाखवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पंतने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासातील 130 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आणि नवा विश्वविक्रम केला आहे.
सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने स्फोटक फलंदाजी करून चाहत्यांची मने जिंकली. पंतने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक आहे . पंतने भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. पंत 33 चेंडूत 61 धावा करून बाद झाला होता. त्याने 61 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
भारताकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पंतच्या नावावर आहे. 2022 साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत 28 चेंडूत अर्धशतक झळकावण्यात पंत यशस्वी ठरला होता.
पाचव्या डावातील दुसऱ्या दिवसाचा खेळ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. सामन्यात दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. तसेच 313 धावा झाल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 172 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स गमावल्या. तर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 4 धावांच्या नाममात्र आघाडीसह 141 रन्स करत 6 विकेट्स गमावल्या. टीम इंडिया या सामन्यात 145 धावांनी आघाडीवर आहे.
गंभीरचा विक्रम मोडला
सिडनी कसोटीत पंतने प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा खास विक्रम मोडीत काढला. ऋषभ पंत आता त्याचे सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कसोटी धावांचा आकडा (1832) मायदेशाबाहेर मागे टाकण्यात यशस्वी झाला. पंतने आतापर्यंत भारताबाहेर 29 कसोटी सामने खेळले असून 1842 धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
130 वर्षापूर्वीचा विक्रमही मोडला
याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीतील हे पाहुण्या संघाच्या खेळाडूने केलेले देखील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी 1895 मध्ये इंग्लंडच्या जॉन ब्राऊन यांनी 33चेंडूत, तर वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिकने 1975 मध्ये 33 चेंडूत ऑस्ट्रेलियामध्ये अर्धशतक झळकावले होते.