वाढत्या उष्णतेचा पशुधनाला फटका ; उपचारांअभावी गमविले प्राण

जिल्ह्यात तापमानाचा पारा कमी होण्याची चिन्हे नाहीत. मागील दीड महिन्यापासून तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश कधीच पार केला.  दोन आठवड्यात तापमान ४४ ते ४७ अंश दरम्यान स्थिर असल्याने मानवी जीवांसह पशुधनाला या वाढत्या तापमानाचा फटका बसला आहे. गेल्या सप्ताहात भडगाव तालुक्यात पशुचिकित्सक अधिकाऱ्याना बोलावूनही ते पशुधनावर उपचारासाठी पोचले नसल्याने दोन दुभत्या गायींचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

जिल्ह्यात ‘मे हिट’च्या वाढत्या तापमानाच्या उष्माघाताचा फटका केवळ माणसांनाच सहन करावा लागतो वा बसतो असे नव्हे, तर शेतातील केळी बागायती पिकांना तसेच मुक्या जीवांनादेखील कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या शंभरहून अधिक मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात स्थानिक पशुचिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्मा घातामुळेच मेंढ्या मरण पावल्याचे निदान त्यांनी दिलेल्या अहवालात केले आहे.

पशुचिकित्सक पोचलेच नाहीत

वाढत्या तापमानामुळे व वेळेवर उपचार न मिळाल्याने भडगाव तालुक्यातील पांढरद येथे दोन दुभत्या गायींचा सलग दोन ते तीन दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला असल्याचे माहिती संबंधीतांनी दिली. भडगाव येथील जिल्हा परिषदेच्या पशुचिकीत्सालयात संबधीत पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते तेथे नव्हते. परंतु चिकीत्सालयातील पशुव्रणोपचार यांना पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना पाठवून देण्याविषयी पशुधन मालक विठ्ठल हिलाल पाटील यांच्या मुलाने सांगीतले. परंतु, भडगाव पशुवैद्यकिय अधिकारी उपचारासाठी आलेच नसल्याने खाजगी पशुवैद्यकाकडून उपचार केले.  परंतु १०६ पर्यंत ताप असल्याने त्या गायीचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर लागलीच दोन तीन दिवसांनी दुसऱ्या गायीचा देखील उष्णतेमुळेच मृत्यू झाला असत्याचे दिसून आले आहे. गार्गीसाठी गोठा तसेच तापमान योग्य राहण्यासाठी हिरव्या कापडाचे आच्छादन देखील केलेले आहे. या सर्व गायींचे व पशुधनाची ऑनलाईन नोंदणी केली असून सर्व पशुधनाला टॅग आहे. गेल्या सप्ताहात शुक्रवार २४ मे रोजी सकाळी एका गायीचा मृत्यू झाला तर त्याच्या पूर्वी सात आठ दिवस अगोदर १४ मे रोजी एका गायीचा मृत्यू झाला होता. दोन्ही गायींना ताप आल्याचे खासगी पशुवैद्यकांनी सांगीतले असल्याचे पशुधनमालक विठ्ठल हिलाल पाटील यांनी सांगीतले.

सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान अधिक असल्याने  पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. आपले पशुधन सावलीत बांधावे तसेच त्यांना थंड व मुबलक पाणी पिण्यास द्यावे. हिरवा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. ज्या ठिकाणी आपले पशुधन बांधले असेल त्या जवळच पाण्याची व्यवस्था करावी. मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. आपल्या गोठ्यामध्ये शक्य असल्यास शॉवर्स, पाण्याचे फवारे मारावेत. उन्हामध्ये बैलांना कामाला लावू नये आहे.

– डॉ. श्यामकांत पाटील, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव.