पिंप्रीजवळ रस्तालूट करणारी टोळी अटकेत

जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्रीजवळ धुमाकूळ घालणार्‍या रस्ता लुटारूंच्या टोळीला अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात धरणगाव पोलिसांनी यश मिळवले आहे. सुनील अशोक कुर्‍हाडे (वय 19 रा.पिंप्री खुर्द, ता. धरणगाव), गोपाल संजय कुर्‍हाडे (वय 22, रा.पिंप्री खुर्द, ता. धरणगाव), गणेश संजय कुर्‍हाडे (वय 20, रा.पिंप्री खुर्द, ता. धरणगाव), कृष्णा अनिल (वय 19,रा.पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त :

रस्त्यात अडवून वेगवेगळ्या घटनेत दोघांना मारहाण करून लुटल्याच्या खळबळजनक घटना पिंप्रीजवळ घडल्या होत्या. पहिली घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विनोद शिवाजी पवार (रा. पढावद, ता. शिंदखेडा) यांच्यासोबत घडली. अज्ञात तीन ते चार लोकांनी त्यांना वाघळूद बुद्रूक गावाकडे जाणार्‍या रोडवर, पिंप्रीखुर्द गावाबाहेरील साई नगरजवळ अडवले. यानंतर विनोद पाटील यांना जमिनीवर खाली पाडून त्यांच्या खिशातील मोबाईल, ब्लू टूथ आणि दीड हजार रुपये रोख असा एकूण 16 हजार 50 रुपये किमतीचा ऐवज जबरीने लुटून नेला होता. दुसरी घटना अवघ्या अर्ध्या तासानंतर म्हणजे अकराला घडली होती. संदीप सुरेश बोरसे (रा.सात्री, ता. अमळनेर) यांना धरणगावकडे जाणार्‍या नदीवरील पुलाजवळ तीन-चार अज्ञात इसमांनी येवून धक्काबुक्की करून खिशातील 9 हजार 800 रुपये किमतीचा मोबाईल लुटून पोबारा केला. या प्रकरणीदेखील गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यांचा तपास पो.ना. मोती पवार, पोहेकॉ राजेंद्र कोळी, उमेश पाटील करीत आहेत.

मौजमस्तीसाठी चोरी

पोलिसांनी सुनील कुर्‍हाडे, गोपाल कुर्‍हाडे, गणेश कुर्‍हाडे, कृष्णा राठोड यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील एक मोबाईल आणि ब्ल्यू टूथ जप्त केला आहे. चौकशीत फक्त मौजमस्तीसाठी आपण जबरी चोरी करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अवघ्या विशीतील तरुण त्यातही दोन सख्खे भाऊ फक्त मौजमस्तीसाठी गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आल्यामुळे पोलीसही हैराण झालेत. या टोळीकडून अजून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.