जळगाव : गेल्या ३५ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या संतप्त नागरिकांनी आज, सोमवारी महानगरपालिकेवर धडक दिली. या वेळी महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
जळगाव शहरातील दुर्वांकुर पार्क ते गुड्डूराजा नगर, पिंप्राळा रोड परिसरातील नागरिक, गेल्या ३५ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येला तोंड देत आहेत. कर भरूनदेखील योग्य रस्ता मिळत नाहीय. परिणामी कच्च्या रस्त्यामुळे धूळ, चिखल आणि अपघातांची समस्या निर्माण झाली आहे.
तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारही नाही. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज, सोमवारी महानगरपालिकेवर धडक दिली.
या वेळी महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. अन्यथा आगामी काळात महापालिकेचे कुठलेही कर भरणार नाहीत. रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.