राहुल शिरसाळे
जळगाव : या महानगरातील अयोध्या नगर (Ayodhya Nagar, Jalgaon) हे एक उपनगर. या भागातील रस्त्याची, म्हणजे माझीच कथा. एकेक कथा वाचायला सुरम्य. मात्र माझ्यासाठी वेदनादायी, त्रासदायक, तर विषय होता, अयोध्या नगरातील रस्त्याचा. या भागात श्रीराम मंदिर आहे. प्रत्यक्ष प्रभू रामाचं मंदिर त्याच्या समोरील गल्लीतील रस्ता. बहुप्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली. लोकांना आणि मलाही हायसे वाटले. पण हाथ रे देवा. येथेही प्रतीक्षाच. मंजुरीनंतर आठ-नऊ महिन्यांनी या रस्त्याचे काम सुरू झाले. कोणताही रस्ता घ्या. तो चांगला असला तर लोकांना, वाहन चालकांना आनंद देणारा असतो. पण आमची व्यथा कोण जाणतो.
अहो, जेसीबीचे ते घाव सोसावे लागतात. प्रचंड वजनाचं रोडरोलर अंगावर फिरत असतं. त्या यातना, वेदना मलाच माहीत. पण लोकांच्या आनंदात मी आनंदी असतो. असो. तर विषय आहे, अयोध्या नगरातील रस्ता. याचे काम इकडून तिकडून सुरू झाले. सिमेंटचा रस्ता बनू लागला. पण, या रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, हे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. आनंद आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विसर त्यांना पडलेला नाही. लोकांनी मक्तेदाराविरोधातही रोष व्यक्त केला आहे.

या भागातील नागरिकांना गेल्या ३० ते ३१ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा होती. या रस्त्याची निविदा वर्षापूर्वी मंजूर झाली. प्रत्यक्षात काम आठ-नऊ महिने उलटल्यावर सुरू झाले. काम सुरू झाल्याने ते लवकरच पूर्ण होईल. आपल्याला सुस्थितीतील रस्ता मिळेल. याची त्यांना खात्री वाटली. मात्र मक्तेदाराने जवळपास ६० फूट लांब सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला… आणि काम थांबविले. या घटनेलादेखील जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत. मक्तेदाराने वाळू मिळत नसल्याचे सांगितले.
खरे काय? ते कोणी सांगावे? हा रहिवाशांना प्रश्न पहला या कामाला पुन्हा मुहूर्त कधी मिळेल… कोण सांगेल? काही सांगता येत नाही. मात्र नागरिकांचा, रहदारीचा जाच वाढलेला. लहान-मोठे अपघात ही नित्याची बाब झाली आहे. या रस्त्यावरून एका तरुणाचा मोटरसायकल स्लीप झाल्याने पाय फॅक्चर झाला आहे.
रहिवाशांकडून खंत व्यक्त
अपूर्ण अवस्थेतील रस्त्यामुळे येथील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागतेय. शाळकरी मुलांना ने आण करणारी स्कूल बस रस्ता खराब असल्याने घरापर्यंत येत नाही. सकाळी सकाळी महिला पालकांना हे एक काम म्हणजे स्कूल बसजवळ मुलांना पोहचवणे सर्वच शाळांमध्ये आता परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच रस्त्याची काळजी आणि पालकांना त्यांची काळजी करावी लागत आहे. अपूर्ण रस्ता लवकर पूर्ण करावा याकरिता येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधीकडे वारंवार तक्रार केली. रहिवाशांची संवेदना तीव्र धडपड करूनही त्यांना कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही. ही खंत या रहिवाशांनी व्यक्त केली आहे.