धुळे : सुरत येथील भंगार व्यावसायिक व अन्य दोघांना साक्री तालुक्यात बोलवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे लुटीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी निजामपूर पोलीसांनी अवघ्या दोन तासात या घटनेतील दोघां संशयितांना अटक केली.
सुरत येथील भंगार व्यावसायिक पुनीत शर्मा व सोबत असलेले दोघांना ३०० टन भंगार असल्याची बतावणी करत तीन ते चार दरोडेखोरांनी जामदे गावात बोलविले. त्यांना जंगलात घेवून दोरीने बांधून जबर मारहाण करीत त्यांचेकडील असलेले पैसे व सोने बळजबरीने हिसकावून लुट केली.
या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्यासह शोधपथकाने लुटीच्या गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने उलगडा केला. यातून त्यांनी संशयित रोहित अमीर चव्हाण (३२ रा.जामदे,ता.साक्री) भुऱ्या निला भोसले (३२ रा.जामदे ता.साक्री) या दोघांना ताब्यात घेत विचारपुस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाणेचे प्रभारी मयुर भामरे,उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे,विशाल पाटील, हेडकॉन्सटेबल मालचे,अहिरे, शिंदे,पवार,चालक देवरे यांनी केली आहे.