‘सॉरी’ यार! रोहितने LIVE सामन्यात मागितली अक्षरची माफी,नेमकं काय झालं? व्हिडिओ होतोय व्हायरल

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला सामना रंगला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत बांगलादेशला अडचणीत टाकले आहे.

 मोहम्मद शमीने सामन्याच्या  पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिल्यानंतर हर्षित राणाने दुसरी विकेट घेतली.  शमीने सामन्यातील दुसरी विकेट घेतल्यानंतर बांगलादेशची अवस्था ३ बाद २६ अशी केली होती. त्यानंतर अक्षर पटेल हा ९व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि त्याने बांगलादेशला दुहेरी धक्का दिला. त्याने दुसऱ्या चेंडूवर तन्झिद हसनला केएल राहुलकडे झेलबाद करून माघारी पाठवले. लगेचच, तिसऱ्या चेंडूवर अनुभवी मुश्फिकुर रहिमलाही बाद केले. सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद केल्याने अक्षर पटेलच्या हॅट्ट्रिकची संधी निर्माण झाली.

अक्षरने हॅट्ट्रिक बॉल टाकताच चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. मात्र, रोहितने अनपेक्षितरीत्या झेल सोडला, ज्यामुळे अक्षरची हॅट्ट्रिक हुकली. हा झेल सुटताच रोहितने मैदानावर संताप व्यक्त करत हात आपटले. त्यानंतर त्याने अक्षर पटेलकडे हात जोडून माफी मागितली.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, क्रिकेटप्रेमी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी रोहितची चूक मान्य करत माफी योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी हॅट्ट्रिक हुकल्याने नाराजी व्यक्त केली.