Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील हालचालींनी राजकीय चर्चांना नवीन वळण दिले आहे.
गेल्या काही दिवसांत शरद पवार गटातील काही महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात ”पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार की काय ? अश्या चर्चांना उधाण आलं आहे.
शशिकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीने चर्चांना सुरूवात झाली. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचा त्यांनी दावा केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी या भेटीवर शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर आता शरद पवार गटातील आणखी दोन प्रमुख नेते, रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे.
नेत्यांच्या भेटींच्या कारणांमागील स्पष्टीकरण
रोहित पाटील
तासगाव-कवठेमहाकाळ मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी भेटीचे कारण मतदारसंघातील विकासकामे असल्याचे सांगितले.
सलील देशमुख
काटोलमधील पराभूत उमेदवार आणि अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनीही अजित पवारांची भेट घेतली.
यामुळे चर्चांना उधाण आले आहे, कारण अनिल देशमुख हे शरद पवारांचे निकटवर्ती मानले जातात.
राजकीय विश्लेषण
या भेटी केवळ विकासकामांसाठी झाल्या की त्यामागे काही वेगळे राजकीय समीकरण आहे, याबाबत सध्या तर्क-वितर्क सुरू आहेत. त्यातच शरद पवार गटातील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याने गटांतील अंतर्गत संबंध आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र, मतदारसंघातील कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली असल्याचे रोहित पाटील यांनी स्पष्ट केलंय.