मुंबई : रोहित शर्मा हे टी-२० चे जगातील यशस्वी कर्णधार आहे. त्यांनी उत्तम कॅप्टनच्या परंपरेला चार चांद लावले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीने विधानभवनात टीम इंडियाच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या अपराजित भारतीय टीमने टी-२० विश्वचषक जिंकला त्यातील चार यशस्वी खेळाडूंचं स्वागत करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. रोहित शर्मांनी आपल्याला विश्वविजेता होऊन आनंद दिला, तर त्याच दिवशी टी-२० मधून निवृत्ती घेऊन दु:खही दिलं. भारताच्या क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंच्या मांदियाळीत रोहित शर्माचं नाव आहे, हे आपण मान्य करायला हवं. कपिल देव आणि धोनीनंतर त्यांनी आपल्याला विश्वचषक जिंकून दिला आहे.”
हे वाचलंत का? – आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण! दरेकरांनी सुनावले खडेबोल
“राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की, तुम्ही रोहित शर्मांची पत्रकार परिषद बघावी. कमीत कमी बोलून आपल्या देहबोलीतूनही आपल्याला उत्तर देता येतं हे त्यांच्याकडून शिकता येईल. रोहित शर्मा हे टी-२० चे जगातील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. त्यांच्या नावावर अनेक मोठमोठे विक्रम आहेत. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही कॅप्टन म्हणून त्यांनी त्यांच्या टीमचा मिळवलेला विश्वास आहे. उत्तम कॅप्टनच्या परंपरेला चार चांद जोडण्याचं काम रोहित शर्मांनी केलं आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “सुर्यकुमार यादव यांच्या नावातच सुर्य आहे आणि तो मावळता नाही तर उगवता सुर्य आहे. हे चारही खेळाडू मैदानात उतरल्यावर चौके आणि छक्के यांचा हिशोबच राहत नाही. टीम अडचणीत असताना सेंचूरी मारणं खूप महत्वाचं आहे. असेच खेळाडू आपल्याला जिंकून देऊ शकतात. त्यांनी पकडलेला कॅच आपण कधीच विसरू शकणार नाहीत. या सगळ्या खेळाडूंनी महाराष्ट्राला धन्य केलं आहे आणि महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे,” असेही ते म्हणाले.
“आता मुंबईला वानखेडे स्टेडियमपेक्षाही मोठ्या स्टेडियमची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय या सगळ्यांना जी मदत लागेल ती मदत त्यांना आम्ही करु. येत्या काळात मुंबईमध्ये १ लाख लोकं मावतील असं स्टेडियम करण्यात यावं, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.