---Advertisement---
वॉशिंग्टन : भारतावर लादलेले अतिरिक्त २५ टक्के शुल्क तत्काळ मागे घ्यावे आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याची मागणी करणारे पत्र अमेरिकेच्या १९ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठविले आहे. खासदारांनी पाठविलेल्या पत्राबाबत व्हाईट हाऊसने बुधवारी दुजोरा दिला.
महिला खासदार डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांच्या नेतृत्वात १९ खासदारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, अमेरिकेचे भारतासोबत ताणलेले संबंध सुधारण्यासाठी आणि अतिरिक्त शुल्क मागे घेण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. शुल्क वाढीमुळे भारतीय वस्तूंचे दर ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही असलेल्या देशाशी संबंध ताणले गेले आणि अमेरिकेतही महागाईने उच्चांक गाठला आहे.
शुल्काच्या निर्णयामुळे दोन्ही देशांवर नकारात्मक होत आहे. अमेरिकन कंपन्या उत्पादने बाजारात आणण्यासाठी ज्या पुरवठा साखळ्यांवर अवलंबून आहेत त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांनी व्यापारी भागीदार म्हणून भारताचे महत्त्वदेखील पत्रातून अधोरेखित केले.
नोकरीच्या संधी गमावणार
सेमीकंडक्टर, आरोग्यसेवा आणि ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये भारत अमेरिकेचा प्रमुख भागीदार आहे. अमेरिकन कंपन्यांची भारतात मोठी गुंतवणूक असून, अतिरिक्त शुल्काचा फटका त्यांना बसत आहे. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत केलेल्या गुंतवणुकीमुळे स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी मिळत आहे, हे विसरू नये. भारताने अमेरिकेसारखा निर्णय घेतल्यास देशातील नोकऱ्या धोक्यात येऊ शकते, असेही पत्रात नमूद आहे.









