RSS : सामाजिक पंच परिवर्तनासहित विविध विषयांवर बैठकीत चर्चा होणार : सुनील आंबेकर

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक दि. १२ ते १४ जुलै दरम्यान सरला बिर्ला विद्यापीठ, रांची येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर सरला बिर्ला विद्यापीठाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षांमध्ये सामाजिक परिवर्तनाचे पाच उपक्रम शाखा स्तरावर आणि समाजापर्यंत नेण्याची योजना बैठकीत आखली जाणार असल्याचे सांगितले.

या बैठकीत संघाच्या विविध कार्य योजनांवर चर्चा व आढावा घेण्यात येणार असल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, संघ दरवर्षी तीन महत्त्वाच्या बैठका घेतो. नुकतेच झालेले प्रशिक्षण वर्ग आणि संघाच्या सर्व कार्य क्षेत्रातील विविध विषयांसह त्यांचे कामकाज आणि त्यांची अंमलबजावणी यावर चर्चा होणार आहे. यासोबतच सरसंघचालकांचा देशभरातील प्रवास यासंदर्भातही चर्चा होणार आहे.

पुढे ते म्हणाले, सध्या देशभरात ७३ हजार शाखा कार्यरत आहेत. येत्या शताब्दी वर्षात देशभरात प्रत्येक मंडल स्तरावर किमान एक शाखा असावी या योजनेवर काम सुरू आहे. यासोबतच विविध धार्मिक व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने संघाच्या सेवा कार्यातून शहरांमधील वस्त्यांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान शारीरिक विभागातर्फे यावर्षी अनेक नवीन खेळ विकसित करण्यात आले असून ते शाखा स्तरावर नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शताब्दी वर्षातील कार्य विस्तार योजना पूर्ण करण्यासाठी देशभरातील ३ हजार कार्यकर्ते शताब्दी विस्तारक म्हणून दोन वर्षांचा वेळ देत आहेत. समाजातील चांगल्या शक्तीला स्वतःशी एकरूप करून सामाजिक परिवर्तनासाठी एकत्र कसे काम करता येईल याबाबत व समाजजीवनाच्या इतर अनेक विषयांवरही बैठकीत चर्चा होणार आहे.

या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, ४६ प्रांतातील प्रांत प्रचारक, सह-प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.