---Advertisement---
संघकार्याचा विस्तार तसेच संघाच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमाबाबत प्रांतप्रचारकांच्या त्रिदिवसीय बैठकीत व्यापक चर्चा झाल्याचे रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज सांगितले. शताब्दी वर्षात देशातील प्रत्येक गाव आणि घरापर्यंत पोहोचण्याची संघाची योजना असल्याचे ते म्हणाले.
रा. स्व. संघाच्या देशभरातील प्रांतप्रचारकांची त्रिदिवसीय बैठक नुकतीच राजधानी दिल्लीतील केशवकुंज या संघ कार्यालयात पार पडली. या बैठकीतील कामकाजाची माहिती केशवकुं जमध्ये देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत आंबेकर म्हणाले की, प्रांतप्रचारकांच्या बैठकीत कोणताही निर्णय होत नाही तसेच प्रस्तावही पारित केले जात नाही, तर संघकार्याचा आढावा घेतला जातो, तसेच पुढील वर्षीच्या कामाच्या दृष्टीने नियोजन केले जाते.
प्रांतप्रचारक देशाच्या विविध भागांत काम करत असतात, काही प्रांतप्रचारक वनवासी तसेच सीमावर्ती भागात काम करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनुभव या बैठकीत मांडत असतात. संघाचे स्वयंसेवक या भागात स्थानिक लोकांना संघटित करत त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
प्रशिक्षण वर्गात २१८७९ स्वयंसेवक सहभागी
एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात संघातर्फे देशभरात १०० प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, असे स्पष्ट करत सुनील आंबेकर म्हणाले की, ४० वर्षपिक्षा कमी वयोगटाच्या स्वयंसेवकांसाठी ७५ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यात १७६०९ स्वयंसेवक सहभागी झाले.
४० ते ६० या वयोगटातील स्वयंसेवकांसाठी आयोजित २५ प्रशिक्षण वर्गांत ४२७० स्वयंसेवकांनी भाग घेतला. दोन्ही वर्गात देशातील ८८१२ ठिकाणचे २१८७९ स्वयंसेवक सहभागी झाले होते.
मणिपुरात संघ स्वयंसेवकांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद
मणिपूरमधील सद्यः परिस्थिती तसेच त्याठिकाणी संघाचे स्वयंसेवक करीत असलेले काम तसेच सामाजिक सद्भावनांसाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न यावरही बैठकीत चर्चा झाली, याकडे विशेषत्वाने लक्ष वेधत सुनील आंबेकर म्हणाले की, राज्यातील परिस्थिती पूर्ववत् करण्याच्या स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. स्वयंसेवक दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करत आहे.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हावे
आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा या राष्ट्रभाषा आहेत आणि प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झाले पाहिजे, ही संघाची भूमिका असल्याचे सुनील आंबेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. आमिष दाखवून, जोरजबरदस्तीने, लोकांच्या असहायतेचा गैरफायदा घेत तसेच षडयंत्र रचत धर्मांतर करणे चुकीचे असल्याचे आंबेकर यांनी दुसऱ्या एका प्रश्नावर सांगितले.