---Advertisement---
रा. स्व. संघाच्या प्रांत प्रचारकांची अ. भा. स्तरावरील त्रिदिवसीय बैठक शुक्रवार ४ जुलैपासून दिल्लीत होत आहे. या बैठकीत संघाचे शताब्दी वर्ष आणि संघटनात्मक मुद्यावर चर्चा होणार आहे. रा. स्व. संघाच्या देशभरातील प्रांतप्रचारकांची बैठक ४, ५ आणि ६ जुलैला राजधानी दिल्लीतील केशवकुंज या नव्याने बांधलेल्या संघ कार्यालयात होत असल्याचे रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी आज केशवकुंजमध्ये एका पत्रपरिषदेत सांगितले.
या बैठकीला देशभरातील प्रांत प्रचारक, सहप्रांतप्रचारक, क्षेत्रप्रचारक आणि सहक्षेत्रप्रचारक उपस्थित राहणार आहेत, असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले. संघप्रेरित ३२ संघटनांचे राष्ट्रीय संघटनमंत्रीही या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
मार्चनंतर रा. स्व. संघातर्फे देशभरात १०० प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यापैकी ७५ वर्ग ४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील स्वयंसेवकांचे, तर २५ वर्ग ४० ते ६० गटातील स्वयंसेवकांचे होते. या प्रशिक्षण वर्गात सेवा विभागासह विविध कार्य विभागाचे प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले जाते. संघाच्या स्थायी प्रकल्पातही अशाच प्रशिक्षित स्वयंसेवकांची गरज पडत असते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वयंसेवक धावून जातात.
पुरी येथील जगन्नाथ यात्रेतील दुर्घटनेच्या वेळी तसेच अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या वेळी स्वयंसेवक मदत कार्यात सहभागी झाले होते, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. रा. स्व. संघाची शताब्दी हा या बैठकीचा मुख्य विषय आहे. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रांताने तयारी केली केली, काही योजना तयार केल्या आहेत. त्यावर या बैठकीत चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.
शताब्दी वर्षाचा शुभारंभ २ ऑक्टोबरला नागपूर येथे विजयादशमीला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत होणार
आहे. त्यानंतर पुढील वर्षभर शाखा, मंडल आणि वस्तीस्तरावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असे आंबेकर यांनी सांगितले.
एका विशेष अभियानांतर्गत संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन संपर्क करतील तसेच संघाचे साहित्य वितरित करतील. देशभरात नगर आणि खंड स्तरावर सामाजिक सद्भावना बैठकीचे आयोजनही केले जाणार आहे.
जिल्हा पातळीवर हिंदुत्व, राष्ट्रहित आणि भविष्यातील भारत अशा विषयांना घेऊन चर्चा आणि परिसंवादाचे आयोजनही केले जाणार आहे. या काळात तरुणांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे, असे ते म्हणाले. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासोबत विशेष संवाद कार्यक्रमांचे आयोजन दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू अशा महानगरात केले जाणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुणकुमार, रामदत्त, अतुल लिमये आणि आलोककुमार या बैठकीला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला अ. भा. सहप्रचारप्रमुख प्रदीप जोशी आणि नरेंद्र ठाकूर उपस्थित होते.
संघाला समजून घेण्यात आणि जुळण्याबाबत मोठा उत्साह
समाजात संघाला समजून घेण्याबाबत तसेच संघाशी जुळण्याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. तरुणांमधली मोठी संख्याही संघाशी जुळण्याबाबत उत्सुक आहे. यावर्षी झालेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गात तरुणांनी मोठ्या संख्येत भाग घेतला आहे. एप्रिल ते जून दरम्यान राबवण्यात आलेल्या ‘जॉईन आरएसएस ‘च्या माध्यमातून २८,५७१ जणांनी संघाशी जुळण्यासाठी ऑनलाईन पंजीकरण केले आहे.