Success : रुईखेडा जि. प. शाळेतील शिवम गवळी ‘या’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम

मुक्ताईनगर : फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद मराठी शाळा रुईखेडे येथील विद्यार्थी शिवम कांता गवळी हा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण भागातून मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम  पटकाविला. त्याचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम सनानसे व रुईखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच उषा गुरचळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थीनी आचल गोपाळ चौधरी हिचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शालेय वेळा व्यतिरिक्त जादा तास घेऊन तयारी करून घेणाऱ्या वर्गशिक्षिका निता काकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम सनानसे, अजय गुरचळ, विद्यार्थ्याचे पालक कांता गवळी, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भागवत गाढे, शिक्षक प्रमोद दुट्टे व इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते. ग्रामीण भागातून पहिला आल्याने गुणवंत विद्यार्थी, आणि मेहनत घेणाऱ्या वर्गशिक्षिका यांचे शिक्षण विभाग व ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्हा परिषद शाळेने,ग्रामीण भागातील हिऱ्याला दिली चकाकी

साधारणतः सर्वत्र पालकांचा महागडी फी भरून इंग्लिश स्कूल माध्यमांमध्ये पाल्यांना शिक्षण देण्याचा कल वाढला आहे. परंतु, या पालकांच्या अपेक्षांना इंग्लिश माध्यमांच्या शाळा खऱ्या उतरत नसून अनेक इंग्लिश माध्यमांचा मुलांना ना धड इंग्लिश येते आणि ना धड मराठी , त्यामुळे “एक ना धड, भाराभार चिंध्या” अशी परिस्थिती शिक्षणाची झाली आहे. सर्वत्र केवळ शिक्षणाचा बाजार मांडल्याचे चित्र आहे.  या महागड्या शिक्षणाला आव्हान देण्याचे कार्य काही जिल्हा परिषदेचे शिक्षक करीत असून गोरगरिबांची मुले यांना शिक्षणाच्या उच्च प्रवाहात आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असल्याचे दिसून येते.  असेच काहीसे मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी चंग बांधला आहे. नुकतेच, फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी शिवम कांता गवळी हा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ग्रामीण भागातून मुक्ताईनगर तालुक्यातून प्रथम आला. याच्या खऱ्या यशाचे श्रेय जाते ते विद्यार्थ्यासह जि.प.शाळेच्या वर्गशिक्षिका निता राजीव काकर व शिक्षक प्रमोद दुट्टे यांना. कारण शाळेची वेळ संपल्यानंतरही 2 ते अडीच तास जास्तीची वेळ देवून आपला विद्यार्थी शिष्यवृत्तीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पाहिजे हा ध्यास बाळगून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला जिल्हास्तरीय परीक्षेत चांगल्या गुणांनी तालुक्यातून प्रथम आणले.