वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर मंगळवारी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्स यांनी भेट द्विपक्षीय चर्चा झाली.
पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही बैठक झाली. यावेळी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीसंदर्भात जयशंकर यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर लिहिले की, पदभार स्वीकारल्याच्या काही तासांतच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत दोन्ही देशांची मैत्री. संबंध अधिक बळकट करण्याबाबत एक तास सविस्तर चर्चा झाली.
धोरणात्मक सहकार्य पुढे नेण्यासाठी अमेरिकेसोबत एकत्र काम करण्यास भारत उत्सुक आहे. क्वाड सदस्य देशांच्या प्रतिनिधींसोबतही बैठक झाली, यामध्ये अमेरिकेसह जपानचे परराष्ट्रमंत्री इवाया ताकेशी व ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग उपस्थित होते. भारत-प्रशांत विकासासह या भागातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ही बैठक स्पष्ट करते की, क्वाड जागतिक हितासाठी एक शक्ती म्हणून सदैव काम करीत राहील.