सबजेलमध्ये एका बंदिवानावर अन्य सहबंदिवानांनी अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार, त्यानंतर एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथे शासनमान्य खासगी वसतिगृहात पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा प्रकार पाहता सुरक्षितता ही राहिली कोठे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. सबजेल म्हणजे तेथे सर्वच प्रकारचे आरोपी असतात. तेथील संरक्षणासाठी दिवसरात्र पोलिसांचा पहारा असतोच असतो, मात्र तरीही असे घृणास्पद प्रकार घडणे किती भयंकर म्हणावे. सबजेलमध्ये बेकायदेशीर कृत्याचे प्रकार नेहमी घडत असतात. तेथील बंद्यांना भेटण्यास येणार्या त्यांच्या नातेवाईकांना कसे ताटकळत ठेवले जाते,
त्यामागील ‘अर्थ’पूर्ण व्यवहार या विषयांच्या चर्चा बर्याच वेळेस ऐकायला मिळतात. किंबहुना याबाबत प्रचंड तक्रारी नेहमी होत असतात. यासह काही बंदिवानांना होणारी मारहाण, त्यांच्यातील अंतर्गत वादाचे प्रकार, हाणामार्या यातून एखाद्याचा मृत्यूही होतो, तर आत असलेल्या काही बड्यांना मिळणारी व्हीआयपी वागणूक असले प्रकारही बर्याचदा चर्चेेचा विषय ठरले आहेत. आत असलेल्या बंदींकडे मोबाईल सापडणे, शस्त्र सापडणे हे प्रकारही समोर आलेले आहेत आणि त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो तो त्याठिकाणी असलेल्या संरक्षणाचा. जर एक-दोन नव्हे तर अनेक पोलीस ज्या परिसरात गस्त घालून असतात त्यांची करडी नजर या भागात असते. तेथे एका बंद्याचे लैंगिक शोषण होत असेल तर प्रकार अतिशय गंभीर म्हणावा लागेल.
तेथील बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचार्यांचे कारनामे बर्याच वेळेस समोर येत असतात. रक्षकच कसे भक्षक होतात याच्या सुरस तेवढ्या धक्कादायक कथा समोर येतात. सबजेलमध्ये असलेल्या व्यक्तीच्या वर्तणुकीचा विचार केला तर सज्जन व्यक्तिमत्वे तेथे असतील याची खात्री कोणी देणार नाही. असे असताना अशा पद्धतीने तेथील यंत्रणा गाफील राहणे गंभीरच आहे. त्यामुळे यातील सर्व संबंधितांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
दुसरी घटना म्हणजे एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथे शासनमान्य खासगी वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे तेथीलच काळजीवाहकाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला. ग्रामीण भागात आजही अनेक वाडेवस्त्या अशा आहेत की, त्या ठिकाणी शिक्षणाची सोय नाही. नजीकच्या तालुक्याच्या ठिकाणी मुले-मुली शिक्षणासाठी जातात. आपण शिकलो नाही, आपली मुले शिकावीत, मोठी व्हावीत, अशी अपेक्षा मनी बाळगून पालक मुला-मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवतात, पण त्यांच्याबरोबर असे धक्कादायक प्रकार घडतात. एक-दोन नव्हे तर पाच अल्पवयीन की ज्या नऊ ते बारा वयोगटातील, या पाच मुलींबाबत हा धक्कादायक प्रकार घडला आणि थोडा नव्हे तर तब्बल वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.
त्यात आणखी गंभीर बाब म्हणजे या नराधम काळजीवाहूच्या पत्नीनेही हा प्रकार समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले. यासह यंत्रणेतील अन्य पदाधिकार्यांच्या कानी हा विषय आल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे अतिशय घृणास्पद प्रकाराला जणू पाठबळच मिळत गेले. बाललैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याविषयी कठोर कायदे असताना त्याची पर्वा केली जात नाही किंवा बर्याच वेळेस सबळ पुराव्याअभावी आरोपी सुटतात. याप्रश्नी शासन पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. घटनेनंतर नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी येथे येऊन संबंधित मुलींचे जबाब नोंदवून घेतले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर खटला दाखल करून अत्यल्प कालावधीत आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहेे.
तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी असलेल्या वसतिगृहांमधील सुरक्षेची वेळोवेळी तपासणी होणेही गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यावर लक्ष ठेवले जाणे गरजेचे आहे. शिक्षणासाठी आलेल्या बालिकांंचे अशा पद्धतीने शोषण होत असेल तर भविष्यात पालक अशा ठिकाणी त्या बालकांना ठेवतील काय? यामुळे ज्या ठिकाणी चांगली कार्यपद्धती आहे त्याकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जाईल. त्यामुळेच या वसतिगृहांच्या कार्यपद्धतीकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाणे आता गरजेचे झाले आहे