नवीन महामार्गाच्या कामाला अजून वर्षही लोटले नाही. त्यापूर्वीच महामार्गाच्या दैनावस्थेला सुरूवात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जान्हवी हॉटेलपासून ते थेट तरसोद फाट्यापर्यत महामार्ग खड्डेयुक्त बनला आहे. एकीकडे शासन महामार्ग आणि रस्त्यांवर पैसा खर्च करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासन कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. अपघाताला निमंत्रण मिळेल, अशा पध्दतीचे कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येते. धुळे-भुसावळ महामार्गावरील खड्डयामुळे वाहनधारक संतप्त होत असल्याचे दिसून येते.
वर्ष होण्यापूर्वी आणि पावसाळा संपण्याच्या आधीच नवा महामार्ग बिकट अवस्थेतून वाटचाल करीत आहे. खड्डे चुकवित ते वाहन चालविताना चालक कसरत करीत आहेत. डांबर उखडून त्याठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. जागोजागी ते ठळकपणे दिसतही आहेत. पण कोणाला काय? अशा पध्दतीने त्याकडे पाहिले जात आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांच्यादेखील संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
कामाचा दर्जाही राखला जावा
नवीन महामार्गाच्या कामाचा मोठा बोलबाला झाला. अनेक महिने या रस्त्याच्या कामाला लागले. महामार्ग उत्कृष्टच असेल, असा सर्वत्र बोलबाला होता. परंतु वर्ष होण्याच्या आधीच महामार्गाला खड्डयांनी घरघर लावल्याचे दिसते. याबाबत जबाबदारी कुणाची आणि कारवाई करणार कोण? असेही प्रश्न उभे राहिले आहेत.
रस्त्यांच्या खड्डयांच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली आहे. अयोध्यानगर, खेडी, गोदावरी महाविद्यालय इत्यादी ठिकाणी दुरूस्ती झाल्याचे महामार्गावर खडी व मुरूम पडतो आहे. परंतु हे काम किती दिवस तग धरू शकेल, याची शाश्वती नाही.
महामार्गाच्या नवीन रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊन अजून वर्षदेखील झाले नाही.जान्हवी हॉटेल,खेडी,गोदावरी महाविद्यालय,चांडक हॉस्पिटल ते थेट तरसोद नाक्यापर्यत महामार्गाची दैनावस्था झाली आहे.शासन महामार्गावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे. मात्र कामात उत्कृष्ठता नाही. पैश्यांची राखरांगोळी मात्र झाली. अधिकारी करतात काय? याबाबतही विचार होण्याची गरज आहे.
-रवींद्र शिंदे, जळगाव
दुरूस्ती पण कामाचा स्तर दुय्यमच
महामार्गावरची दुरूस्ती तात्पुरती स्वरूपाची आहे,असे ते काम पाहताना प्रत्येक वाहनचालक तक्रार करीत असतो. खड्डे भरून अल्प डांबराचा स्तर त्यावर खडीचा बारीक खच टाकून मलमपट्टी केली जात आहे. ही दुरूस्ती कितपत तग धरेल, हे येणारा काळच सांगेल, परंतु आधीचे दर्जात्मक काम झाले नसल्याने महामार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. दुरूस्तीच्या कामाचा स्तरही दुय्यमच आहे. दुरूस्तीच्या कामामुळे वाहने जात येत असताना मोठा धुराळा उडतो आहे. याचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहन चालकांना होत आहे. ट्रॉन्सपोर्टनगर जवळही महामार्गावर खड्डे निर्माण झाले आहेत. अंतराअंतरावर महामार्गाची अवस्था अवघड होत असल्याचेही दिसते आहे.