ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

#image_title

छत्रपती संभाजीनगर : सुप्रसिध्द मराठी समिक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांना २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदाचे गद्यरुप’ या त्यांच्या समिक्षणात्मक पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा साहित्य अकादमीने केली आहे.

साहित्य अकादमीने २१ भाषांमध्ये ८ काव्यंसग्रह, तीन कादंबरी, २ लघुकथा संग्रह, ३ साहित्य समीक्षक,१ नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. बंगाली, डोगरी आणि उर्दू भाषेसाठीचे पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीने सांगितलं आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. ८ मार्च २०२५ रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

विचक्षण लेखक आणि वाचनमग्न समीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा असलेले डॉ. सुधीर रसाळ ९१ व्या वर्षात देखील त्याच उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्त आहेत. शतकी वाटचालीकडे निघालेल्या रसाळ सरांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या १६ व्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे.

कोण आहेत सुधीर रसाळ?

डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे सध्या ९१ वर्षांचे असून या वयातही अलिकडेच त्यांच्या १६ व्या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय. तसंच प्राध्यापक म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं.