शिर्डी : येथील साईबाबा मंदिर श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार, १७ एप्रिल रोजी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना साईबाबा यांचे दर्शन घेणे सोयीस्कर होईल, याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
साई दरबारात विविध उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांपैकी रामनवमी हा महत्वाचा उत्सव मानला जातो. साईबाबा हयात असल्यापासून शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ आजही ही परंपरा पाळत आहे.
शिर्डीत साजरी करण्यात येणारा रामनवमी उत्सव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. उद्यापासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ होईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले असेल. या तीन दिवसीय उत्सव काळात साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.