तरुण भारत लाईव्ह न्यूज । भटेश्वर वाणी । : प्रत्येक जेवणातील स्वाद हा मिठामुळे बदलत असतो. जेवणात मीठ जास्त झाले किंवा कमी झाले तरी ते जेवण बेचव होते. याचप्रमाणे मिठामध्ये आयुर्वेदिक घटकही आहेत. ज्यामुळे नागरिकांचे आरोग्यही सुधारते पण याच मिठाचे प्रमाण वाढले तर आरोग्य बिघडतेही. यातही सध्या मिठाचे वेगवेगळे प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यात आयोडीन युक्त मीठ, खडा मीठ, काळे मीठ (संसयखार), सेंधव मीठ यासह अनेक प्रकार आहे. यातच आता कोणालाही माहीत नसणार्या पहाडी काळे व पांढरे मीठ राजस्थानातील मीठ विक्रेत्यांनी जळगावात विक्रीसाठी आणले आहे. यामुळे आता जळगावकरांना या मिठाचे फायदे तर समजणारच आहे. शिवाय हे आयुर्वेदिक मीठ जळगावकरांच्या रोजच्या जेवणातील चवदेखील बदलणार आहे.
सध्या या मिठाची विक्री राजस्थानातील मीठ विक्रेते करताना जळगावच्या रस्त्यांवर दिसत आहेत. त्यांच्या वाहनांवर मीठ विक्रीसह ठेवलेल्या संसारीक सामानाने जळगावकरही आकर्षिले जात आहेत. शहरातील गल्ली-बोळातील रस्त्यांवर दहा ते बारा वाहनांवर सेंधव आणि काळ्या मिठाचे मोठमोठे दगड विक्री केले जात आहेत. या दगडांचे रहस्य काय यासाठी जळगावकर नागरिक या वाहनांकडे अचानक वळताना दिसतात.
काळे मीठ
शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्याचे काम करते. काळे मीठ हे अधिक चविष्ट असून शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीही रोजच्या आहारात काळ्या मिठाचा समावेश करू शकता. काळे मीठ कशासाठी? मिठाच्या तुलनेत लोह आणि खनिजाचा अधिक साठा असतो. रोजच्या पांढर्या मिठापेक्षा काळे मीठ हे अधिक फायद्याचे असते. काळ्या मिठामध्ये पोटॅशिअम, आयर्न आणि कॅल्शिअम असते. आरोग्यासोबत त्वचेसाठीही काळे मीठ हे फारच लाभदायी आहे.
सेंधव मीठ
सेंधव मीठ हे आरोग्यवर्धक मीठ आहे. सैंधव मीठ खाणीतून मिळते. खाणीतून किंवा आटून गेलेल्या खार्या तलावांतून उत्खनन करून सैंधव मीठ बनविले जाते. सैंधव मिठामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत करते. सेंधव मीठ कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत करते. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मिठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचा बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. पित्त झाल्यास आलं, लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडेथोडे खाल्ल्यास पित्तामुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते.
हे मीठ पाकिस्तानातील पहाडात आठळते. ते पाकिस्तानातून राजस्थानात येते. ते आम्ही मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांकडून विकत घेतो आणि देशभरात या मिठाची विक्री करतो. यामुळे अनेकदा जेवणासाठी आमचे हाल होतात, पर्यायाने आम्हाला आमचे कुटुंबही सोबत घेऊन फिरावे लागते. ते सर्व या वाहनावर देश भ्रमंती आम्ही करतो. या मिठामुळे आरोग्य चांगले राहते. या मिठाचे जेवढे फायदे आहे तेवढेच त्याचे प्रमाण खाण्यात जास्त झाल्याने तोटेही आहेच.
-जिंदर कुमार, मीठ विक्रेता, गंगा नगर, राजस्थान