संभल : उत्तरप्रदेशातील संभल येथून रोज नवीन माहिती समोर येत आहे. महसूल विभागाने चंदोसी येथे शनिवारी केलेल्या खोदकामात एक मोठी विहीर सापडली.
चंदौसीतील लक्ष्मण गंज क्षेत्रात १८५७ पूर्वी हिंदूंचे बाहुल्य होते. येथे सैनी समाजाचे लोक राहायचे. मात्र, आता येथे मुस्लिमांची संख्या वाढली आहे. संभल येथे ४६ वर्षांपूर्वीचे जुने मंदिर सापडल्यानंतर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले होते. लक्ष्मण गंज येथे पूर्वी बिलारीच्या राणीची विहीर होती, असे या पत्रात म्हटले होते.
त्यानंतर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना तपासाचा आदेश दिला. शनिवारी नायब तहसीलदार धीरेंद्रसिंह यांच्या नेतृत्वातील पथक नकाशासह येथे पोहोचले. विहीर असलेल्या परिसरात मध्यभागी खोदकाम सुरू केल्यानंतर जमिनीतून प्राचीन इमारत बाहेर येणे सुरू झाले. खोदकामात दोन मजली इमारत आढळली. या प्राचीन विहिरीचा आणि तलावाचा अभिलेख आहे. येथे बोगदाही सापडू शकतो, असे नायब तहसीलदार धीरेंद्रसिंह यांनी सांगितले. ही विहीर खूप मोठी आहे. ती मातीत दबली आहे. माती हटवून तपासणी केली जात आहे. नकाशाच्या आधारे ही तपासणी केली जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय पुरातत्त्व विभागाचे पथक शनिवारी कल्की मंदिरात दाखल झाले.
त्यांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले. यात १९ विहिरी आणि पाच तीर्थांचा समावेश आहे. पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या पुजाऱ्याला सोबत घेऊन सर्वेक्षण केले. पथकाने मंदिराच्या आत तयार करण्यात आलेल्या घुमटाचे छायाचित्रही घेतले. सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्वेक्षण अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आले. यापूर्वी शुक्रवारी पुरातत्त्व विभागाच्या पथकाने लाडम सराय येथील मंदिरातील प्राचीन इमारतीतून निघालेल्या दगडाच्या मूर्तीची छायाचित्रेही घेतली.