वार्डांमध्ये राहिलेल्या कामांना प्राधान्य, दोन दिवसात कामांचे प्रस्ताव मागविले जल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत महापालिकेला विकासकामांसाठी 30 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सर्व नगरसेवकांना आपल्या वार्डात विकास कामे करण्यासाठी 7 रोजी महापौर यांचे दालनात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत उपस्थित नगरसेवकांकडून समान निधी वाटपावर एकमत झाले आहे. दोन दिवसात आपल्या वार्डातील राहिलेल्या विकास कामांचे प्रस्ताव देण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी दिल्या.
यात नागरी दलित वस्ती सुधार योजनेत मिळालेल्या 14 कोटी 94 लाख निधीतून दलित वस्ती अंतर्गत येणार्या शहरातील पाच प्रभागांमध्ये 20 नगरसेवकांना प्रत्येकी मिळणार्या 74 लाख निधीतून कामे करावी. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून मिळालेल्या 15 कोटी 24 लाख 82 हजार 800 रु. यातून शहरातील 52 नगरसेवकांनी सामान निधी वाटप केल्यास प्रत्येकाच्या प्रभागाच्या विकास कामांसाठी 30 लाख रुपये मिळू शकतात. शिवाय नगरसेवक स्व. निधी प्रत्येकी 25 लाख रु.दिला जाणार आहे. यातून प्रभागातील विकास कामे नगरसेवक करू शकतात. या विषयावर सोमवार महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, भाजपचे डॉ.आश्विन सोनवणे, अॅड.शुचिता हाडा, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेना उबाठा गटाचे अनंत जोशी, नितीन बरडे, इब्राहिम पटेल, शिवसेना शिंदे गटाचे नवनाथ दारकुंडे, एमआयएम गटाचे रियाज बागवान, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते.
यात या सर्व विषयांवर चर्चा होऊन नगरसेवकांना सामान निधी वाटप करण्यावर एकमत झाले असून महापौर जयश्री महाजन यांनी दोन दिवसात आपल्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव जमा करावे, ज्या नगर सेवकांकडून प्रस्ताव येणार नाही त्या प्रभागात विकास कामांची आवश्यकता नसल्याचे समजण्यात येईल, असे महापौरांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.