समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात ! शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश ?

मुंबई : महाराष्ट्रातील IRS अधिकारी समीर वानखेडे राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्च्यांनी वेग धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. ते मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. IRS अधिकारी तीन वर्षांपूर्वी समीर वानखेडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं होतं. समीर वानखेडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.

राजीनामा दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात सहभागी होतील, धारावी हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्या धारावीमधून आमदार होत्या. पण 2024 ला खासदारकीची निवडणूक जिंकून त्या लोकसभेवर गेल्या. 2019 साली शिवसेनेने धारावीमधून आशिष वसंत मोरे यांना उमेदवारी दिली होती. पण वर्षा गायकवाड यांनी शिवसेना उमेदवाराचा दारुण पराभव केला होता.

कोण आहेत समीर वानखेडे ?
समीर वानखेडे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भरुणतोफा या गावचे आहेत.त्यांचे वडील राज्य सरकारच्या अबकारी विभागात काम करत असत.समीर वानखेडेंचे शिक्षण मुंबईतून झाले. त्यांचे वडील 1970 मध्ये मुंबईत आले होते.समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंन्सीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. या सर्व कारवायांमागे समीर वानखेडे यांचं दमदार नेतृत्व आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या अनेक मित्रांची चौकशी केली आहे. अनेक दिवस ते या प्रकरणांमुळे चर्चेत होते.