उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचा गुरुवार, दि. १८ जुलै रोजी अपघात झाला. यात एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक लोकांच्या सहाय्याने त्यांनी मदत आणि बचाव कार्यास सुरुवात केली.
अवध प्रांतातील शंभरहून अधिक स्वयंसेवक सेवा कार्यात गुंतले होते. गोंडा विभाग, गोंडा जिल्हा, नंदिनीनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना मानकापूर आणि गोंडा जिल्हा रुग्णालयात नेले. यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी खासगी आणि सरकारी रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला. स्थानिक प्रशासनासह स्वयंसेवकांनी प्रवाशांचे विखुरलेले सामान गोळा केले. रुग्णालयात स्वयंसेवकांनी ३० युनिट रक्तदान केले. त्याचवेळी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरही सक्रिय झाले होते.