संक्रांत आणि पतंगोत्सव

तरुण भारत लाईव्ह । सीमा मोडक। संक्रांत म्हटली म्हणजे आबालवृद्धांचा आनंदाचा सण. गुजरात राज्याच्या सीमेवर असणाऱ्या नंदुरबार शहरात तर अधिकच उत्साहात हि संक्रांत साजरी होते. अगदी भोगीच्या दिवशी संध्याकाळपासूनच पतंग उत्सवाची तयारी सगळे करतात.यात घरातील आबालवृद्ध अगदी महिलासुद्धा पुढे असतात बर का. प्रत्येकाच्या घरावर, मग ते पत्रे असो कौल असो वा स्लॅब. संक्रांतीला संपूर्ण कुटुंब पतंगाचा आनंद घेताना दिसतात. काही ठिकाणी मित्र, नातेवाईक हेसुद्धा आवर्जून दुसऱ्या गावाहून येतात.

पतंग उडवण्याबरोबरच नाश्ता, चहा अगदी जेवणसुद्धा गच्चीवरच असत. घरातील मंडळी आपापल्या सोयीनुसार आणि कुवतीनुसार चक्री पकडणे, पतंगाना दुरुस्त करणे, त्याला दोरा बांधणे अशी काम अगदी उत्साहात करत असतात. अगदी पहाटेपासून गाण्यांच्या साथीने हा पतंगोस्तस्वा साजरा होतो किंव्हा हाताच्या बोटांना दोऱ्याने कापलं गेलं तरी उत्साह पहाटेपासून संपूर्ण काळोख होईपर्यंत तेव्हढाच असतो. रात्री दिव्यांच्या पतंगांनी संपूर्ण आकाश उजडून निघते. ते संपूर्ण दिवस आकाशात इंद्रधुनुष्यचं अवतरते.

खरंच संक्रांतीचा सण म्हणजे त्या पतंगाप्रमाणे आनंद गगनात न मावणारा असतो. मला वाटतं नुकतंच थंडीने आपल्याला अस्तित्व कमी केलेलं असतं. संक्रातीच्या दिवशीचं ऊन अंगावर घेऊन उन्हाळ्याची चाहूल लागत असते. ऋतू बदलण्याची मानसिकता होते.

आकाशातील त्या उंच पतंगाप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे उच्च असं ध्येय ठरवावे. पण कितीही यशाची उंची गाठली तरीही चक्री जशी खाली असते. तसेच आपले पाय जमिनीवर ठेवावे. अर्थात त्या यशाची धुंदी, अहंकार आपल्याला नसावा. पतंग उडवताना जसे एकमेकांना तो पतंगवर जाण्यासाठी आपण मदत करतो. अगदी तसंच आपल्या जीवनात आपण मागावं. पतंग उत्सवातील वेगवेगळ्या रंगांच्या आकाराच्या पतंगाप्रमाणे आपल्या आयुष्यातही आनंदाचे विविध रंग यावे. आणि हो, प्रत्येकाने संक्रांतीच्या दिवशी तरी मोबाईल दूर ठेवून मोकळ्या हेवेत पतंग उडवण्याचा, लुटण्याचा कट करण्याचा आनंद मनापासून घ्यावा. मग बघा सोशल मीडियावरच्या बैठ्या खेळांपेक्षा आपला पतंग आपल्याला किती आनंद उत्सव देईल. एक, दोन, अनेक पतंग कापले गेले तरीही हताश, निराश न होता पुन्हा त्याच जोमाने आपण जसा पतंग उडवतो अगदी तसंच आयुष्यात अडचणी संकटे आली तरी निराश नव्हता पुन्हा नव्याने आयुष्यात पतंग रुपी ध्येयाच्या दिशेने जायचं हे आज नक्की ठरवू या.

आपल्या सगळ्यांना या मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.