तरुण भारत लाईव्ह । १४ जानेवारी। राज्य सरकराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी परिवहन मंडळाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगार व्यवस्थित व्हावा म्हणून हा निधी देण्यात आला असून, कर्मचाऱ्यांचा थकीत पगार आता तात्काळ दिला जाणार आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत आता गोड होणार यात शंका नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०२२ वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करावा,अशी मागणी परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी पत्राद्वारे शासनाकडे केली होती.त्या अनुषंगाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबरच्या वेतनासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबरच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबतचे परिपत्रक जरी करण्यात आले.
३०० कोटी रुपयांचा हा खर्च २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदींमधून भागविण्यात यावा. यासाठी परिवहन आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या निधीची रक्कम राज्य परिवहन महामंडळास अदा करावी, असे शासन आदेशात म्हटले आहे.