बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे.
पण हे सर सुरु झालं ते पवनचक्की प्रकल्पापासून कारण केज मधील मस्साजोग गावच्या हद्दीत आवादा कंपनीचा पवनचक्की पर्यंत या हत्येचे धागेदोरे पोहचले आहे. ६ डिसेंबरला प्रतिक घुलेसह इतर काही लोकांनी प्रकल्पस्थळी येऊन सुरेश सोनवणे, प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेंना २ कोटी रूपये खंडणी मागत जबर मारहाण केली. मारहाणीनंतर मस्साजोगचे रहिवाशी अशोक सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर ६ तारखेलाच केज पोलीस ठाण्यात घुलेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्या ३ दिवसांनंतर सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.
त्यानंतर या प्रकरणाच्या निषेध आणि आरोपींच्या अटकेसाठी जिल्हाभरात बंद पाळण्यात आला. तरीही अद्याप चार आरोपी फरारच आहेत. अपहरण व खूनप्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे व विष्णू चाटे या सात जणांवर गुन्हा नोंद आहे.
आतापर्यंत पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे व महेश केदार या तिघांना अटक केली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे फरार आहेत. आता घटनेला आठ दिवस होत आहेत. पोलिसांनी अद्यापही आरोपी शोधले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण खुनाच्या घटनेला आठ दिवस उलटले तरी अद्याप घटनेतील प्रमुख आरोपींसह मुख्य सुत्रधार अद्यापही फरारच असल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना हत्येच्या नियोजनाबद्दल आधीच माहिती होतं का?
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवसाआधीचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पीएसआय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओनुसार, केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेलमध्ये आरोपी सुदर्शन घुले , पीएसआय राजेश पाटील यांची भेट होते. त्यानंतर काही वेळातच धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्यात काही चर्चा होते. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे.
मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भूमिका ?
धनंजय देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी त्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा प्यायला गेलो होतो. त्यावेळी पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी घुले हे त्या ठिकाणी आले. यावेळी पीएसआय राजेश पाटील यांनी वेटरला सांगून मला बोलावून घेतलं आणि यापूर्वी ६ डिसेंबरला झालेल्या हाणामारीबाबत माहिती घेतली. मी त्यांना सांगितलं की आमचं भांडण मिटलं आहे. आमचं इतकंच बोलणं झालं, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.