Dhananjay Munde : धनंजय मुंडे-अजित पवार यांच्यात सव्वा तास चर्चा; राजीनाम्याच्या चर्चांना वेग

#image_title

 संतोष देशमुख हत्याप्रकरणी निकटवर्तीयांना अटक झाल्यानंतर अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह महायुतीतील नेत्यांनीही केली आहे.

तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याचा आरोप करून भाजपचे आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह अनेकांनी त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा आग्रह धरला आहे.

बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चे काढून संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात जनक्षोभ दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सव्वा तास भेट घेतली. या भेटीचा तपशील उघड न झाल्यास चर्चा हत्याप्रकरणावरच केंद्रित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शुभेच्छा की दबाव ?

धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छांसाठी होती. “आपल्याला मिळालेल्या अन्न व पुरवठा खात्याचा अहवाल अजितदादांसमोर सादर केला,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकीय विरोधकांनी या स्पष्टीकरणाला डावलत राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे.

तपास आणि आरोप

संतोष देशमुख यांच्या हत्येत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे. पवनचक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सबळ पुरावे सादर केले असून, तपास कार्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या भविष्यावर कोणता निर्णय होणार आणि हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी कशा पद्धतीने पुढे जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.