Satish Wagh Case : भाडेकरूसोबत अनैतिक संबंध, पत्नीच निघाली पतीच्या हत्येची मास्टरमाइंड

Satish Wagh Case : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. पोलीस तपासानुसार, सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हीचे भाडेकरू अक्षय जावळकर याच्यासोबत अनैतिक संबंध होते. यातूनच सतीश वाघ यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, मोहिनी आणि अक्षय यांचे 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सतीश वाघ यांना या संबंधांबद्दल माहिती मिळाली होती, त्यामुळे भाडेकरू अक्षय आणि त्याच्या कुटुंबाला वाघ यांनी दुसरी जागा दिली. पण अक्षय आणि मोहिनी यांचा संबंध कायम होता, आणि अखेर त्यांनी सतीश वाघ यांची हत्या करण्याचा कट रचला.

पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे, ज्यात मोहिनी वाघ, अक्षय जावळकर, आणि इतर काही आरोपींच्या नावे समोर आले आहेत. तपासानुसार, अक्षय आणि त्याचे कुटुंब 2006 पासून सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होते, आणि वाघ यांच्या घरातच अक्षयचं कुटुंब आणि त्याचे वडील एक वडापाव व भेळ गाडा चालवत होते.

अक्षय आणि मोहिनी यांचे प्रेमसंबंध सतीश वाघ यांना 8 वर्षांपूर्वी कळले होते, त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे जाऊन राहायला सुरुवात केली होती. तथापि, अक्षय वाघ यांच्या घरात ये-जा करत होता, सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्र होते, अशी माहिती समोर आली आहे.

या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम

कुटुंबाची पार्श्वभूमी : 2001 साली अक्षय जावळकर आणि त्याचे आई-वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्याकडे  भाडेकरू म्हणून राहायला आले.

अक्षय आणि वाघ कुटुंबाची मैत्री : सतीश आणि मोहिनी यांचा मुलगा आणि अक्षय यांचा वय तसा समान होता, त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री होती.

अनैतिक संबंधांची सुरूवात : 2013 मध्ये अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले.

अक्षयचे शिक्षण आणि लग्न : अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि 2016 मध्ये त्याचे लग्न झाले, तरीही मोहिनीशी त्याचे प्रेमसंबंध कायम राहिले.

सतीश वाघ यांचा वाद : सतीश वाघ यांना त्यांचा आणि मोहिनीच्या संबंधाचा संशय आला, ज्यामुळे वाद सुरू झाले.

हत्येचा कट: मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा कट रचला आणि अक्षयने त्याच्या मित्रांची मदत घेतली.

हत्या: 9 डिसेंबरला सतीश वाघ यांचा अपहरण करून, 70 वार करून हत्या करण्यात आली.

पोलिसांची तपासणी: पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयचे कॉल रेकॉर्ड तपासून हत्येचा खुलासा केला.